मुंबई : बॉलिवूडचा बादशाहा, अभिनेता शाहरुख खान (Shah rukh khan), त्याच्या जीवनात सध्या सुरु असणाऱ्या तणावाच्या काळातही एका अनोख्या अंदाजात चाहत्यांच्या भेटीला आला आहे. मागील काही काळापासून चित्रपटांच्या माध्यमात काहीसा कमी सक्रिय असणारा किंग खान दिवाळीच्या निमित्तानं काही जाहिरातींमध्ये झळकत आहे. मुख्य म्हणजे यावेळी तो लहानसहान दुकानांच्याही जाहिराती करताना दिसत आहे.
एका जाहिरातीसाठी कोट्यवधींचं मानधन घेणारा हा शाहरुख तुमच्याही दुकानाचं नाव घेणार आहे बरं..... कसं?
तर, दिवाळी सेलिब्रेशनच्या निमित्तानं कॅडबरीनं एक सुरेख जाहिरात साकारली आहे. जिथे कोरोना काळामुळे उद्योगधंद्यांवर झालेल्या परिणामार्थ, सर्वांनाच आपल्या परिसरातील दुकानांतून वस्तू, मिठाई वगैरे गोष्टी खरेदी करण्याचं आवाहन शाहरुख करताना दिसत आहे. इतकंच नव्हे, तर तो काही दुकानांची नावंही घेताना दिसत आहे.
मुख्य म्हणजे ही जाहिरात इतक्या सुरेखपणे साकारण्यात आली आहे, की यामध्ये तुम्ही राहता त्या भागाचा पिनकोड टाकून तिथे तुम्हाला हवं त्या दुकानाचं नाव देत शाहरुखच्या तोंडून ते नाव तुम्ही वदवून घेऊ शकता. कल्पनाशक्तीचा एक अनोखा नमुना या जाहिरातीच्या निमित्तानं पाहायला मिळत आहे.
असं असलं तरीही सोशल मीडियावर मात्र काहींनी शाहरुखला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तर काहींनी आर्यन खान ड्रग्ज आणि अटक प्रकरणाचा संबंध जोडत शाहरुखला जाहिरातीत घेण्याचा विरोधही केला आहे.