काश्मिरी हिंदूंना प्रकाशझोतात आणण्याचा दिग्दर्शकाचा निश्चय

नेमकं काय उलगडणार ?   

Updated: Aug 14, 2019, 12:38 PM IST
काश्मिरी हिंदूंना प्रकाशझोतात आणण्याचा दिग्दर्शकाचा निश्चय  title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : कित्येक दशकांपासून भारतामध्ये जम्मू- काश्मीरच्या मुद्द्यावर दरल दिवशी चर्चा पाहायाला मिळाल्या आहेत. सरकारपासून ते देशातील सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रत्येकाच्याच मनात या भागाविषयी असंख्य प्रश्न घर करुन गेले. त्य़ातच काही दिवसांपूर्वी या भागात लागू करण्यात आलेलं अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आलं. 

जम्मू- काश्मीरसह विविध क्षेत्रांवर आणि स्तरांवर याचे परिणाम पाहायला मिळाले. कलाविश्वही यापासून दूर राहिलेलं नाही. आजवर अनेक चित्रपटांमधून काश्मीर मुद्द्यावर विविध दृष्टीकोनांतून भाष्य करण्यात आलं आहे. त्यातच आता संपूर्णपणे काश्मीर मुद्द्यावरच बेतलेल्या कथानकासह एक चित्रपट साकारला जाणार आहे. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली. द ताश्कंद फाईल्स या चित्रपटानंतर दिग्रदर्श विवेक रंजन अग्निहोत्री यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. 'The Kashmir Files' असं त्या चित्रपटाचं  नाव असून, पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

दरम्यान, या चित्रपटाच्या पोस्टर व्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती उघड करण्यात आलेली नाही. विवेकने या चित्रपटाचा पोस्टर शेअर करत ही घोषणा केली. ज्यामध्ये केशरी रंगामध्ये जम्मू- काश्मीरचा नकाशा दिसत आहे. तारांच्या सुरक्षा कवचात केशरी रंगातील हा जम्मू- काश्मीरचा नकाशा बरंच काही सांगून जात आहे. पोस्टरमध्ये आणखी एक बाब लक्ष वेधत आहे. ती म्हणजे काळ्या रंगातील भागातही एक नकाशा आहे, ज्यावर फिकट रंगात ३७० हे आकडे दिसत आहेत. हे अर्थातच अनुच्छेद ३७०कडे लक्ष वेधण्यासाठी आहेत. 

बरेच बारकावे चित्रपटाच्या पहिल्याच पोस्टरमध्ये टीपण्यात आले आहेत. त्यात विवेकचं ट्विट पाहता कधीही समोर न आलेली कोणती कहाणी आणि काश्मिरी हिंदूंची नेमकी कोणती परिस्थिती तो प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे, याविषयीचं कुतूहल कलाविश्वात पाहायला मिळत आहे. #KashmirUnreported या हॅशटॅगला साजेसा त्याचा हा चित्रपट नेमका कसा असेल, हे पुढच्याच वर्षी स्पष्ट होणार आहे.