मुंबई : कुख्यात गुंड अरुण गवळी याच्या जीवनावर आधारित ‘डॅडी’ या हिंदी चित्रपटाची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. या सिनेमाचे ‘आला रे आला गणेशा’हे पहिले गाणे नुकतेच रिलीज झाले आहे.
अभिनेता अर्जुन रामपाल या चित्रपटात मुख्य भूमिकेत म्हणजेच अरुण गवळीच्या भूमिकेत आहे. दरम्यान, येत्या 8 सप्टेंबर रोजी ‘डॅडी’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे. अर्जुन रामपालने आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन #AalaReAalaGanesha या हॅशटॅगसोबत हे गाणं रिलीज केले आहे. त्याला रसिकांनी रिट्वीट करुन पसंत दर्शविली.
हे गाण प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल असा विश्वास अर्जुन रामपालने व्यक्त केला आहे. यापूर्वी अरुण गवळीच्या आवाजातला ऑडिओ टीझर आणि मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. त्यानंतर आता गाणंही रिलीज करण्यात आले आहे.
'स्वराज्य', 'संघर्ष' यांसारख्या अनेक मराठी सिनेमात दिसलेला राजेश श्रृंगारपूरे डॅडी या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रशांत इंगोले आणि साजिद यांनी गीतलेखन केलं असून, साजिद-वाजिद यांनी संगीत दिलं आहे.