बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल सध्या 'अॅनिमल' चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा दोन मिनिटांचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. या टीझरमध्ये मुख्य अभिनेता रणबीर कपूर, रश्मिका मंधाना, अनिल कपूर दिसत आहेत. तसंच नकारात्मक भूमिका साकारणारा बॉबी देओल याला टिझरच्या शेवटी दाखवण्यात आलं. फक्त 7 सेकंदाच्या या सीनमध्ये तो अगदीच भाव खाऊन गेला आहे. टीझर रिलीज झाल्यानंतर बॉबी देओलचीच सर्वाधिक चर्चा रंगली होती. अनेकांनी त्याच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. दरम्यान, धर्मेंद्र यांनीही बॉबी देओलच्या यी सीनवर प्रतिक्रिया दिली आहे.
धर्मेंद्र यांनी एक्सवर बॉबी देओलचा 'अॅनिमल' चित्रपटातील 7 सेकंदाचा तो सीन शेअर केला आहे. यामध्ये बॉबी देओल उघडा असून, हातवारे करत आत बोलावताना दिसत आहे. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर अतिशय क्रूर भाव दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना धर्मेंद्र यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'माझा निष्पाप मुलगा'.
धर्मेंद्र यांच्याआधी बॉबी देओलला त्याच्या इतर कुटुंबीयांनीही चित्रपटासाठी शुभेच्छा देताना कौतुक केलं होतं. सनी देओलने इंस्टाग्रामला चित्रपटाचा टीझर शेअर करताना 'अॅनिमलचा हिंदी टीझर,' असं लिहिलं होतं.
My innocent son in Animal…….. pic.twitter.com/aCNCuI6hTc
— Dharmendra Deol (@aapkadharam) October 2, 2023
तसंच इशा देओलनेही आपल्या भावाला शुभेच्छा दिल्या आहेत. व्हिडीओ शेअर करताना तिने, शेवटच्या सीनसाठी थांबा असं लिहिलं होतं.
बॉबी देओलने गेल्या आठवड्यात चित्रपटातील त्याचा लूक शेअर केला होता. हे पोस्टर शेअर करताना त्याने लिहिलं होतं की, 'अॅनिमलचा शत्रू'. यावेळी त्याने #AnimalTeaserOn28thSept, #AnimalTheFilm #AnimalOn1stDec हे हॅशटॅग वापरले होते.
अर्जुन रेड्डीचा दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगाने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी प्रमुख भूमिकेत आहेत. टीझरमध्ये बाप आणि मुलामधील हिंसक नातं दिसत आहे. अनिल कपूर आणि रणबीर यांनी बाप आणि मुलाची भूमिका निभावली आहे. हा चित्रपट 1 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.