मुंबई: अभिनेत्री कंगना राणौत हिच्या पाली हिल येथील कार्यालयावर सोमवारी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून अचानक धाड टाकण्यात आली. या कार्यालयात अनधिकृत बांधकाम झाले आहे का, याची पाहणी करण्यासाठी ही धाड टाकण्यात आल्याचे समजते. यावेळी अधिकाऱ्यांनी इमारत प्रस्वात विभागाकडे असलेल्या आराखड्यानुसार कार्यालय आहे की त्यामध्ये अंतर्गत बदल केले आहेत? एफएसआयचे उल्लंघन झाले आहे का, याची तपासणी केली. यापूर्वी कंगनाच्या कार्यालयाला एमआरटीपी नोटीस देण्यात आल्याचेही समजते. त्यामुळे आता या कार्यालयात अनधिकृत बदल आढळल्यास पालिका त्यावर कारवाई करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
'कंगना राणौतला भाजपने राज्यसभेवर पाठवले तर नवल वाटायला नको'
ये मुंबई में मणिकर्णिका फ़िल्म्ज़ का ऑफ़िस है, जिसे मैंने पंद्रह साल मेहनत कर के कमाया है, मेरा ज़िंदगी में एक ही सपना था मैं जब भी फ़िल्म निर्माता बनूँ मेरा अपना खुद का ऑफ़िस हो, मगर लगता है ये सपना टूटने का वक़्त आ गया है, आज वहाँ अचानक @mybmc के कुछ लोग आए हैं pic.twitter.com/C7zGe8ZyGe
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 7, 2020
या सगळ्या घडामोडीनंतर कंगना राणौतने नेहमीप्रमाणे ट्विटसचा सपाटा लावून पालिकेवर निशाणा साधला. पंधरा वर्ष मेहनत करून मी मुंबईतील हे कार्यालय बांधले आहे. चित्रपट निर्माता झाल्यानंतर आपले एखादे कार्यालय असावे, हे माझे स्वप्न होते. मात्र, आता हे कार्यालय जमीनदोस्त होईल, असे वाटत आहे. आज मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने माझ्या कार्यालयात प्रवेश केला. त्यांनी सगळ्या जागेचे मोजमाप घ्यायला सुरुवात केली. तसेच माझ्या शेजाऱ्यांनाही त्रास दिला जात आहे. तुमच्या मॅडमच्या कृतीचे परिणाम सगळ्यांना भोगायला लागणार, असे काही पालिका अधिकाऱ्यांनी म्हटल्याचा दावाही कंगनाने केला. तसेच हे कार्यालय उद्या पाडण्यात येईल, असेही मला कळवण्यात आल्याचे कंगनाने ट्विटमध्ये म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी कंगना राणौतने मुंबई पोलिसांच्या विश्वासर्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाला फटकारले होते. यानंतर कंगना राणाौत शिवसेनेविरोधात प्रचंड आक्रमक झाली होती. ९ सप्टेंबरला मी मुंबईत येणार आहे. तेव्हा आपल्याला रोखून दाखवावे, असे जाहीर आव्हान तिने शिवसेनेला दिले होते.