मुंबई : महसा अमिनी (Mehsa Amini) च्या मृत्यूनंतर इराण (Iran Protest) मध्ये हिजाबविरोधात सुरू झालेलं निदर्शने काळानुसार वाढत आहेत. दरम्यान, आता 'सेक्रेड गेम्स' वेब सीरिजमध्ये दिसलेली अभिनेत्री एलनाज नौरोजी (Elnaaz Norouzi) हिने एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून एकदा पोलिसांनी तिलाही अटक केल्याचं सांगितलं आहे.
एलनाज नौरोजी यांनी इराणबद्दल या गोष्टी सांगितल्या
एलनाज नौरोजी इराणमधील आहेत. मात्र ती भारतात अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून काम करते. तिचं कुटुंब तिथे राहतं, पण आजकाल इंटरनेट आणि संपर्क सेवा बंद झाल्यामुळे ती आपल्या कुटुंबाशी संवाद साधू शकत नाही. दरम्यान, एक व्हिडिओ शेअर करून अभिनेत्रीने इराणमध्ये स्वतःसोबत घडलेल्या एका घटनेबद्दल सांगितलं आहे.
या व्हिडिओमध्ये तिने सांगितलं आहे की, जेव्हा ती इराणमध्ये होती तेव्हा तिला पोलिसांनी अटकही केली होती. ती तिच्या चुलत भावासोबत कुठेतरी बाहेर होती तेव्हा एक महिला आली आणि तिच्या घट्ट पँटबद्दल तिला विचारपूस करू लागली. यानंतर पोलिस तिला अटक करून घेऊन गेले. त्याचबरोबर तिने जेव्हा सैल कपडे घातले तेव्हा तिला सोडण्यात आलं.
एलनाज नौरोजीने पुढे सांगितलं की, तिचा फोन आणि पासपोर्टही तिच्याकडून काढून घेण्यात आला होता. ते लोक विचित्र वागतात. कपडे, हिजाब, अगदी तुमच्या नखांच्या रंगासाठी ते तुम्हाला रोखू शकतात. अमिनीच्या बाबतीत घडलेली भावना कोणाच्याही बाबतीत घडू शकते आणि कोणीही महसा होऊ शकते. जशी की, मी ही होऊ शकते.
विशेष म्हणजे महसा अमिनी ही २२ वर्षीय इराणी महिला होती जिला हिजाब न घातल्याबद्दल अटक करण्यात आली होती आणि तिचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता.