India Vs Baharat: देशाच्या नामांतरावरून अनुराग कश्यप संतापून म्हणाला, 'एका लहरी माणसामुळे...'

Anurag Kashyap On India Vs Bharat Debate: पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-20 शिखर परिषदेमध्ये सहभागी झाले होते त्यावेळेस त्यांच्यासमोर 'इंडिया'ऐवजी 'भारत' नावाची पाटी दिसून आली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 16, 2023, 08:25 AM IST
India Vs Baharat: देशाच्या नामांतरावरून अनुराग कश्यप संतापून म्हणाला, 'एका लहरी माणसामुळे...' title=
एका मुलाखतीमध्ये अनुरागने केलं हे विधान

Anurag Kashyap On India Vs Bharat Debate: भारतात झालेल्या जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर देशाचं इंडिया हे नाव बदलून भारत केलं जाणार असल्याची तुफान चर्चा आहे. यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची वेगवेगळी मतं समोर आलेली असतानाच आता दिर्गदर्शक अनुराग कश्यप यांनी या प्रकरणाबद्दल आपलं रोखठोक मत व्यक्त केलं आहे. देशाचं नाव बदलल्याने नकारात्मक परिणाम होईल असं अनुराग कश्यपने म्हटलं आहे. तसेच समाजातिक सर्वात दुबळ्या घटकांना याचा मोठा फटका बसेल असंही अनुरागने नमूद केलं आहे.

करदात्यांचा पैसा वाया जाणार

देशाचं नाव बदलण्याचा निर्णय हा करदात्यांचा पैसा वाया घालवण्यासारखं ठरेल असंही अनुरागने म्हटलं आहे. तसेच देशाचं नाव बदलल्याने सर्व कागदपत्रांमध्ये बदल करावा लागेल ज्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा त्रास सहन करावा लागेल, असंही या दिग्दर्शकाने म्हटलं आहे. मात्र देशाचं नाव बदलण्याची चर्चा असतानाच सरकारने देशाचं नाव बदललं जाणार असल्याच्या बातम्या आणि चर्चा निव्वळ अफवा असल्याचं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे.

सगळं नव्याने द्यावं लागेल

अनुराग कश्यपने 'हदिद' चित्रपटातील त्याचा सहकलाकार मोहमद झिशान आयुब आणि दिर्ग्दर्शक अक्षत अजय शर्मा यांच्याबरोबर दिलेल्या एका मुलाखतीमध्ये देशाच्या नावावरुन भाष्य केलं. "मला हे समजत नाही की 'इंडिया' हा 'भारत' नाही असं कधी झालं आहे? याने आपण केवळ पेपरवर 'इंडिया'ऐवजी 'भारत' लिहू एवढाच बदल होईल. बरं हे सारं सर्व सरकारी कागदपत्रांवर बदलून घ्यायचं आहे याचा विचार करुन पहा. प्रत्येक पासपोर्ट नव्याने द्यावा लागेल. सर्व आधार कार्ड, रेशन कार्ड नव्याने द्यावी लागतील. सर्वसामान्यांच्या करातून आलेला पैसा यासाठी फार मोठ्या प्रमाणात खर्च होईल," असं अनुराग म्हणाल्याचं वृत्त 'द इंडियन एक्सप्रेस'ने दिलं आहे. 

अधिक काय होणार?

देशाचं नाव बदलताना येणाऱ्या आव्हानांबद्दलही अनुराग बोलला. "सर्व काही बदलावं लागेल. पैसे वाया न घालवता हे सर्व करणं शक्य होणार आहे का? एका लहरी माणसामुळे घेतलेल्या निर्णयाचे परिणाम सगळ्या देशाला भोगावे लागतील. मागचा-पुढचा विचार न करता निर्णय घेतल्यास अधिक काय होणार?" असा प्रश्नही अनुरागने उपस्थित केला.

नाव बदलण्याची केवळ अफवा

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी 'द इंडियन एक्सप्रेस'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये देशाचं नाव बदललं जाण्याच्या बातम्या अफवा असल्याचं म्हटलं. मात्र यामधून देशाला 'भारत' म्हणण्यास त्यांचा कसा विरोध आहे आणि त्यांची विचारसरणी कशी आहे हे दर्शवतं असा टोला ठाकूर यांनी विरोधकांना लगावला. "मला वाटतं या केवळ अफवा आहेत. मला वाटतं की जो कोणी भारत या शब्दाला विरोधत करतोय त्याची विचारसणी कशी आहे हे आपल्या समोर येत आहे," असं अनुराग ठाकूर यांनी म्हटलं.