मुंबई : विकी कौशल आणि कतरिना कैफ हे बॉलिवूडमधील पॉवर कपलपैकी एक आहेत. दोघांची प्रेमकहाणी एखाद्या परीकथेपेक्षा कमी नाही. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 2021 साली राजस्थानमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केलं. या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. चाहत्यांनीही या जोडप्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. त्याचवेळी, लग्नाच्या इतक्या महिन्यांनंतर विकीने खुलासा केला की, कतरिना कैफ त्याच्याकडे इतकं लक्ष का देत आहे याचं सुरुवातीला त्याला आश्चर्य वाटलं होतं.
वास्तविक, अलीकडेच विकी 'वुई आर युवज' या टॉक शोच्या 'बी अ मन यार'च्या एपिसोडमध्ये दिसला होता. यादरम्यान त्याने शोचा होस्ट निखिल तनेजाला त्याच्या कतरिनासोबतच्या लव्हस्टोरीबद्दल अनेक खुलासे केले. यावेळी बोलताना विकी म्हणाला की, 'सुरुवातीला मला धक्काच बसला होता की, बॉलिवूडचा एवढा मोठा स्टार मला भाव का देतोय. मला ही गोष्ट विचित्र वाटली. या गोष्टीवर माझा विश्वास बसत नव्हता.
अशी सुरु झाली कतरिना विकीची लव्हस्टोरी
या विषयी बोलताना विकी म्हणाला, 'कतरिना खूप चांगली व्यक्ती आहे. जेव्हा मी तिला ओळखलं तेव्हा मला वाटलं की, मी माझं संपूर्ण आयुष्य तिच्याबरोबर घालवू शकतो. मग एकदिवशी मी तिला मेसेज केला आणि तिला डिनरसाठी विचारलं. यानंतर आम्ही एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. पण कतरिना लग्नाला हो म्हणेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. मात्र, आम्ही सुरुवातीपासूनच एकमेकांसाठी सिरीअस होतो. हे नातं पुढे जाईल असं आम्हा दोघांनाही आधीच वाटत होतं.
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा 2021 साली शाही विवाहसोहळा पार पडला. त्याचवेळी, दोघांनीही लग्न होईपर्यंत त्यांचं नातं जगापासून आणि मीडियापासून लपवून ठेवलं. राजस्थानातील सवाई माधोपूर जिल्ह्यातील एका भव्य किल्ल्यात दोघांनी सात फेरे घेतले होते. या भव्य लग्नसोहळ्यात कतरिना आणि विकीचे फक्त जवळचे मित्र आणि कुटुंब सहभागी झाले होते. त्याच्या शाही लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवून दिली होती.