मुंबई : नेहमी वादग्रस्त मुद्द्यांवर आपलं परखड मांडणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौतने पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. संपादक अर्णब गोस्वामी अटके प्रकरणी तिने ठाकरे सरकार आणि सोनियासेना असा उल्लेख करत सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. अजून किती जणांचे तोंड बंद करणार, तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात? असे प्रश्न तिने यावेळी उपस्थित केले आहेत. २०१८ साली इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमुद नाईक यांनी आत्महत्या केली होती. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी अर्णब गोस्वामी यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
Message for Maharashtra government @republic #Arnab #ArnabWeAreWithYou #ArnabGoswami pic.twitter.com/AJizRCitS7
— Kangana Ranaut (@KanganaTeam) November 4, 2020
ट्विटरवर एक व्हिडिओ ट्विट करत तिने याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. 'महाराष्ट्र सरकार आणखी किती जणांचे घर तोडणार आहे? किती जणांचे तोंड बंद करणार? एक आवाज बंद कराल तर अनेकांचे आवाज उठतील. पेंग्विन म्हणाल्यावर राग का येतो. पेंग्विनसारखं दिसतात तर म्हणणार ना…वडिलांच्या पप्पूसारखं काम केलं तर पप्पूच म्हणणार ना..सोनियासेना म्हटल्यावर राग येतो का…तुम्ही आहात सोनियासेना.. ' असं वक्तव्य कंगनाने केलं आहे.
काय आहे प्रकरण
५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक आणि आई कुमुद नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी आणि अन्य दोन इसमांनी नाईक यांचे ५.४० कोटी रुपये थकवल्याचा आरोप करत त्यांनी गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरले होतं.