नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीमचे खेळाडू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल हे आज ज्या वादामुळे अडचणीत आले आहेत त्यासाठी चित्रपट निर्माता करण जोहर स्वत:ला जबाबदार मानतोय. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात हार्दिक आणि राहुलने महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर मोठी टीका करण्यात आली होती. या वक्तव्यामुळे बीसीसीआयनेही दोघांवर बंदी घातली होती.
करण जोहर यंदा 'वर्ल्ड इकोनॉमिक फोरम'मध्ये सहभागी होत आहे. त्यावेळी 'ईटी नाऊ' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने याबाबत खुलासा केला. करणने यावेळी मी विचारलेल्या प्रश्नांवर काय उत्तर येईल यावर त्यांचे नियंत्रण नसल्याचे सांगितले. 'हा शो माझा आहे, त्यामुळे यासाठी मी स्वत:ला जबाबदार मानत आहे. हा माझा प्लॅटफॉर्म आहे. मी त्यांना पाहुणे म्हणून बोलवले होते. त्यामुळे या कार्यक्रमामुळे जे काही परिणाम होतील त्याची जबाबदारी माझी असल्याचंही' त्यानं म्हटले. या प्रकाराची भरपाई मी कशी करू? या विचारानेच मी कित्येक दिवस झोपलो नसल्याचंही करणनं म्हटलंय.
हार्दिक आणि राहुलने केलेल्या वक्तव्यामुळे हे प्रकरण अशा मार्गावर आहे जिथे माझे कोणतेही नियंत्रण नाही. मी स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत नाही परंतु जे प्रश्न हार्दिक आणि राहुलला विचारले ते प्रश्न आधीही मी अनेकांना विचारले आहेत, असं म्हणतानाच 'जे प्रश्न विचारले जातात त्यावर येणाऱ्या उत्तरांवर माझे नियंत्रण नसल्याचंही' करणनं स्पष्ट केलंय.
कार्यक्रमासाठी एक कंट्रोल रूम आहे, जिथे १६ ते १७ मुली असतात. 'कॉफी विथ करण' हा संपूर्ण शो महिलांद्वारा चालवण्यात येतो. मी एकटाच तिथे पुरूष आहे. या मुलींपैकी कोणीही मला या दोघांनी केलेले वक्तव्य आक्षेपार्ह असल्याचं तसंच त्यात काही बदल करण्यास सुचवलं नाही. त्यामुळे मलाही याबाबत काही वाटले नाही. पांड्या आणि राहुलसोबत जे झाले त्यांचा मला पश्चाताप होत असल्याची भावनाही यावेळी करणनं व्यक्त केली.
कार्यक्रमाबाबत बोलताना करणने 'मी टीआरपीची पर्वा करत नसल्याचं' म्हटलंय. हा माझा शो आहे. शोमध्ये अनेक वेळा काही चांगल्या गोष्टी, काही बकवास, काही अपमानजनक गोष्टी होत असतात. परंतु आमचा मंत्र 'स्टॉप मेकिंग सेन्स' असा आहे. परंतु दोघांसोबत झालेल्या त्या गोष्टींना मी योग्य मानत नाही. पण जे झालं त्याबद्दल मी मानतो, असं म्हणत करणनं नकळतपणे या दोघांच्या वादग्रस्त वक्तव्याची जबाबदारीही स्वीकारलीय.