बॉलिवूडमध्ये 90 चा काळ ज्या अभिनेत्रींनी गाजवला त्यामध्ये करिश्मा कपूर (Karisma Kapoor) आणि माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) यांची नावं प्रामुख्याने घेतली जातात. 'दिल तो पागल है' (Dil To Pagal Hai) चित्रपटात या दोघी जेव्हा एकत्र आल्या होत्या तेव्हा चाहत्यांसाठी ती पर्वणीच होती. चित्रपटात एका सीनमध्ये दोघींचा एकत्र डान्स आहे. हा डान्स सिक्वेन्स आजही चाहते आवर्जून पाहतात. दरम्यान माधुरी आणि करिश्मा यांनी पुन्हा एकदा हा डान्स करत 1990 च्या काळातील चाहत्यांच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. रिअॅलिटी शो 'डान्स दिवाने'च्या निमित्ताने दोघी एकत्र आल्या होत्या. यावेळी दोघींनी स्टेजवर एकत्रित डान्स केला.
कलर्स टीव्हीने सोशल मीडियावर माधुरी आणि करिश्मा यांच्या डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. दोघी स्टेजवर डान्स करत असताना या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक असणारा सुनील शेट्टीही आवर्जून पाहताना आणि चिअर करताना दिसत आहे. या परफॉर्मन्सनंतर सुनील शेट्टीने म्हटलं की, 'आपली इंडस्ट्री आणि देशातील दोन महान डान्सिंग स्टार्स'. तुमच्यासाठी आजही दिल पागल आहे'.
कलर्सने व्हिडीओ शेअर केल्यानंतर चाहते माधुरी आणि करिश्मा यांच्यावर स्तुतीसुमनं उधळताना दिसत आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं आहे की, 'आजही दोघींमध्ये तितकीच एनर्जी आहे'. तर एकाने लिहिलं आहे की, 'असं वाटत आहे कालचीच गोष्ट आहे. आजही त्या किती तरुण दिसतात'. काही चाहत्यांनी चित्रपटात शाहरुख खानही होता याची आठवण करुन दिली आहे.
आदित्य चोप्राच्या या चित्रपटात करिश्मा आणि माधुरी यांचं शाहरुख खानवर प्रेम असल्याचं दाखवण्यात आलं आहे. दरम्यान जेव्हा करिश्माला हा चित्रपट ऑफर करण्यात आला होता तेव्हा तिला माधुरीसमोर डान्स करावा लागणार असल्याची भीती होती. याचं कारण माधुरी तेव्हा सुपरस्टार होती आणि बॉलिवूडची 'डान्सिंग क्वीन' म्हणून ओळखली जात होती.
दरम्यान 2021 मध्ये 'इंडियन आयडॉल' कार्यक्रमात करिश्माने या चित्रपटाबद्दलचा किस्सा सांगितला होता. "सर्व अभिनेत्रींनी हा चित्रपट नाकारला होता. यानंतर मला या चित्रपटाची ऑफर आली होती. हा डान्स चित्रपट होता आणि समोर माधुरी दीक्षित होती. प्रत्येकाने मला म्हटलं की, माधुरी दीक्षितसमोर कसा काय डान्स करु शकतेस असं सांगितलं. मीदेखील माधुरी दीक्षित समोर असल्याने चित्रपट नाकारला होता. पण नंतर यश चोप्रा आणि आदित्य चोप्रा यांनी मला संपूर्ण कथा सांगितली. माझ्या आईनेही मला तू हे आव्हान घ्यायला हवं, तू माधुरीची मोठी चाहती आहे असं सांगितलं. मेहनत घेतलीस तर तुझीही दखल घेतली जाईल", असं करिश्माने सांगितलं होतं.
1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. करिश्मा कपूरला या चित्रपटासाठी सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.