मुंबई : गेल्या वर्षी नेटफ्लिक्सकडून पहिली ओरिजनल इंडियन वेबसीरीज 'सेक्रेड गेम्स'चा पहिला सीजन प्रदर्शित करण्यात आला. सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्धिकी या कलाकारांसह आणखी एक चेहरा प्रेक्षकांच्या आठवणीत राहिला आहे. ग्लॅमरस ट्रान्सजेंडर 'कुक्कू'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री कुब्रा सैतने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं. एका कार्यक्रमादरम्यान अभिनेत्री कुब्रा सैतने लहानपणी आपल्या नावामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागला असल्याचं सांगितलं.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'गली बॉय' चित्रपटातून एका सुत्रसंचालकेची भूमिका साकारणारी अभिनेत्री कुब्रा सैतने लहानपणी तिच्या नावामुळे तिची खिल्ली उडवली जात असल्याचं सांगितलं. लहानपणी तिच्या कुब्रा नावाऐवजी तिला 'कोबरा' म्हणायचे. माझ्या नावामुळेच माझी खिल्ली उडवली जायची. मला संपूर्ण बालपणात कोबराच बोललं गेलं. लहान असताना मी माझं नाव बदण्यासाठी खूप रडायची, नाव बदलावं म्हणून मी अनेक विनंत्या करायची. परंतु आज मला माझ्या नावाचा अभिमान आहे. आता मी माझ्या नावाच्या ओळखीने आनंदी आहे.
प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्तासह स्किनकेअर ब्रॅन्ड 'ओले'च्या 'फेस एनिथिंग' अभियानाच्या लॉन्चदरम्यान कुब्रा बोलत होती. 'मला वाटतं लोक तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी, तसेच तुम्ही किती चांगले नाही आहात हे पटवून देण्यासाठी अनेक गोष्टी सांगतील. पण जेव्हा तुम्ही स्वत:कडे लक्ष देत मी या सर्वांमध्ये उत्तम आहे. मी या सगळ्याचा सामना करू शकते असे बोलता तेव्हाच तुम्ही या जाळ्यातून बाहेर पडता आणि एक नवीन व्यक्ती म्हणून जगासमोर येतात.' असं तिने सांगितलं. समाजातील महिलांच्या स्थितीवर आपले विचार मांडताना कुब्राने शारीरिक बाधा, समाजातील काही अवधारणा, टीका या कोणत्याही एका व्यक्तीपुरत्या मर्यादित नसल्याचंही तिने म्हटलंय.