...अन् विधू विनोद चोप्राने माझ्या पत्नीच्या हाताचा चावा घेतला; मनोज वाजपेयीने सांगितला 'तो' धक्कादायक अनुभव

बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीच्या (Manoj Bajpayee) आधी बॉबी देओलने (Bobby Deol) 2001 च्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता.   

शिवराज यादव | Updated: Jan 8, 2025, 08:42 PM IST
...अन् विधू विनोद चोप्राने माझ्या पत्नीच्या हाताचा चावा घेतला; मनोज वाजपेयीने सांगितला 'तो' धक्कादायक अनुभव title=

बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीची (Manoj Bajpayee) पत्नी शबाना रझा (Shabana Raza) ही नेहा वाजपेयी नावाने ओळखली जाते. 1998 मध्ये करीब चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात तिच्यासह बॉबी देओल मुख्य भूमिकेत होता. 2009 मध्ये तिने चित्रपटांमध्ये काम करणं बंद केलं. दरम्यान नुकतंच एका मुलाखतीत मनोज वाजपेयीने पत्नीने चित्रपटांमध्ये काम कऱणं बंद का केल? याचा खुलासा केला आहे. 

"तिने चित्रपटांमध्ये काम करणं बंद केलं नाही, तर काही कारणास्तव तिला काम मिळणं बंद झालं. येथे खूप राजकारण आहे. ती बाहेरुन आली असून, येथे तिचा कोणी मेंटॉरही नाही," असं मनोज वाजपेयीने सांगितलं. पण तिला बॉलिवूडमध्ये काही विचित्र अनुभवांचा सामनाही करावा लागला. मनोज वाजपेयीने कशाप्रकारे एकदा दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी तिच्या हाताचा चावा घेतला होता हा धक्कादायक प्रसंग सांगितला. 

हा प्रसंग सांगताना मनोज वाजपेयीने माहिती दिली की, "शबानाकडे कोणतंही चित्रपट प्रशिक्षण नाही. यामुळे गाण्याच्या शुटिंगदरम्यान ती सतत चुकीचा हात वर करत होती. त्या सीनमध्ये तिने डावा हात वर करणं अपेक्षित होतं. पण ती वारंवार उजवा हात वरती करत होती. यामुळे तिने न चुकता डावा हात वर करावा यासाठी विधू विनोद चोप्राने हाताचा चावा घेतला. माझ्यासह असं करण्याची हिंमत कोणी करणार नाही" .

पुढे त्याने सांगितलं की, विधू विनोद चोप्रा यांच्या या कृत्यामुळे पत्नी गोंधळात पडली होती. ती तेव्हा चित्रपटांमध्ये नवीन होती आणि इंडस्ट्रीबद्दल फार माहिती नव्हतं. "ती नवी असल्याने जे काही झालं ते योग्य झालं की नाही हे तिला समजत नव्हतं. तिला वाटलं दिग्दर्शक अशाच प्रकारे वागतात. तिला वाटलं असेल हे सगळे वेडे हुशार आहेत. ते काहीही करण्यात सक्षम आहेत". शबानाचा पहिला चित्रपट करीब हा विधू विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शित केला होता. 

बॉबी देओलनेही काही वर्षांपूर्वी हा किस्सा सांगितला होता. शबानाला किती संघर्ष करावा लागला होता हे सांगताना त्याने म्हटलं होतं की, "ते सतत तिच्यावर ओरडत असत. एका सीनमध्ये नेहाला डोंगरावरुन खाली येत मला तिचा डाव हात द्यायचा असतो. पण ती सतत गोंधळत होती. वारंवार टेक घेतल्यानंतरही जेव्हा ती बरोबर करत नव्हती, तेव्हा विधू यांनी तिच्या उजव्या हाताचा चावा घेतला. पण तरीही पुढच्या सीनमध्ये ती चुकली. 20 टेकनंतर विधू यांचा संताप झाला. मग त्यांनी काय केलं माहिती आहे, त्याने डाव्या हाताचा चावा घेतला. मला काय प्रतिक्रिया द्यावी हे समजत नव्हतं. मला धक्का बसला होता".

करीबनंतर शबाना ह्रतिकसह फिजा, होगी प्यार की जीत या चित्रपटांमध्ये दिसली होती. 2009 मधील अॅसिड फॅक्टरी हा तिचा शेवटचा चित्रपट ठरला.