राजीनाम्यासाठी दबाव वाढताच मंत्रिपद वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंची धावाधाव, वरिष्ठांसोबत भेटीगाठी आणि चर्चा

राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रीपद वाचवण्यासाठी धावाधाव सुरू केल्याचं पाहायला मिळतंय.

सोनेश्वर पाटील | Updated: Jan 8, 2025, 07:32 PM IST
राजीनाम्यासाठी दबाव वाढताच मंत्रिपद वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंची धावाधाव, वरिष्ठांसोबत भेटीगाठी आणि चर्चा title=

बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण सध्या खूपच चर्चेत आहे. अशातच धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे. यादरम्यान, राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रीपद वाचवण्यासाठी धावाधाव सुरू केल्याचं पाहायला मिळतंय. पक्षाचे प्रमुख नेते अजित पवार यांच्यासोबतच धनंजय मुंडे यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्याही भेटीगाठी घेत चर्चा सुरू केलीय. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढल्याचं पाहायला मिळतंय. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

मंत्रिपद वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंची धावाधाव

पवनचक्की खंडणी प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्याविरोधातही विरोधक आक्रमक झालेत. विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने लावून धरलीय. भाजपचे आमदार सुरेश धस, अंजली दमानिया, संभाजीराजे छत्रपती, मनोज जरांगे पाटलांसह बीडमधील सर्वपक्षीय आमदारांनीही धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांची झोड उठवलीये. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्याकडून मंत्रिपद वाचवण्यासाठी धावाधाव सुरू असल्याचं पाहायला मिळतंय.

धनंजय मुंडेंकडून वरिष्ठांच्या भेटीगाठी आणि चर्चा

वाढता दबाव पाहता धनंजय मुंडे यांनी जोरदार लॉबिंग करायला सुरुवात केलीय. 6 जानेवारीला धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्यासोबत भेट घेत तासभर चर्चा केली. अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांनी 7 जानेवारी रोजी कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याशी त्यांच्या सीजे हाऊस या निवासस्थानी जात तब्बल 2 तास चर्चा केली. 2 नेत्यांशी चर्चा करून समाधानी न झालेल्या धनंजय मुंडे यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी देखील फोनवरून चर्चा केली.

जितेंद्र आव्हाड यांचा मुंडेंवर निशाणा

बुडताना माणूस हातपाय मारतो तशी मंत्री धनंजय मुंडे यांची अवस्था झाल्याचं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय.

अजित पवार धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का? 

विरोधक आणि सत्ताधारी पक्षाच्या आक्रमक भूमिकेनंतर अजित पवार धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय. जेव्हा चौकशीतून नाव पुढे येईल तेव्हा कारवाई करू असं म्हणत अजित पवार यांनी तूर्तास तरी मुंडेंना दिलासा दिलाय. मात्र राजीनाम्याचा वाढता दबाव बघता मुंडेंनी वरिष्ठांकडे लॉबिंग सुरू केलंय. आगामी काही दिवसात धनंजय मुंडे यांच्या संदर्भात सरकार पातळीवर काय निर्णय घेण्यात येईल हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे.