Cricket News : भारतातील आयपीएल प्रमाणे इतर देश देखील आता आपापल्या देशात क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी क्रिकेट लीगचे आयोजन करत आहेत. सध्या बांगलादेश प्रीमियर लीग सुरु असून सध्या यातील एक फ्रेंचायझी ही चर्चेचा विषय बनली आहे. बांग्लादेश प्रीमियर लीगमधील दुर्बार राजेशाही ही फ्रेंचायझी वादात अडकली असून रविवारी फ्रेंचायझीने खेळाडूंची नेआण करणाऱ्या बस ड्रॉयव्हरला थकबाकी न दिल्यामुळे त्यांनी क्रिकेटर्सच्या किट बॅग जप्त केल्या होत्या. सदर घटना सध्या खेळ विश्वात चर्चेचा विषय बनली आहे.
बांग्लादेश प्रीमियर लीगची फ्रेंचायझी दुर्बार राजेशाही सध्या आर्थिक संकटांचा सामना करत आहे. फ्रेंचायझीच्या मालकांनी खेळाडूंचा इअसेच इतर सहकाऱ्यांना त्यांचे पैसे दिलेले नाहीत. 30 डिसेंबर ते 7 फेब्रुवारी दरम्यान बांग्लादेश प्रीमियर लीग खेळवली जात आहे, यात सहभागी झालेले संघ सामना खेळण्यासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करतात. याच दरम्यान दुर्बार राजेशाही या संघातील खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बस ड्रायव्हरने त्याला फ्रेंचायझी मालकांकडून थकबाकी न मिळाल्यामुळे संघातील खेळाडूंच्या किट बॅग बसमध्ये बंद करून ठेवल्या.
सदर प्रकारामुळे खेळाडू व्यथित झाले होते. यावेळी बस ड्रायव्हर मोहम्मद बाबुलने हॉटेल समोर असलेल्या पत्रकारांना प्रतिक्रिया देत म्हटले, "ही खूपच शरमेची बाब आहे. जर त्यांनी आम्हाला पैसे दिले असते तर आम्ही खेळाडूंच्या किट बॅग लगेच पार्ट दिल्या असत्या. आतापर्यंत मी काहीही म्हणालो नव्हतो, पण आता मी सांगतोय, त्यांनी जर आम्हाला राहिलेली थकबाकी दिली तर आम्ही लगेच इथून निघून जाऊ. देशातील आणि विदेशातील काही खेळाडूंच्या किट बॅग बसमध्ये आहे पण मी त्यांना देऊ शकत नाही कारण आम्हाला आमच्या पगाराचा मोठा भाग अद्याप मिळालेला नाही".
बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार Cricbuzz ने याबाबत खुलासा केला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार फ्रेंचायझी दुर्बार राजेशाहीने अद्याप त्यांच्या संघासाठी खेळणाऱ्या देश विदेशातील खेळाडूंना त्यांनी वेतन दिलेले नाही.पाकिस्तानचा मोहम्मद हारिस, अफगाणिस्तानचा आफताब आलम, झिम्बाब्वेचा रायन बर्ल, वेस्ट इंडिजचा मिगुएल कमिन्स आणि मार्क डेल हे या सीजनमध्ये दुर्बार राजेशाही संघासाठी खेळले, पण ते अजूनही त्यांना त्यांच्या पगाराचा काही भाग मिळालेला नाही.
पगार न देण्याच्या कारणामुळे संघासाठी खेळणाऱ्या खेळाडूंनी संघाच्या सराव सत्रावर बहिष्कार टाकला आहे. तर काही परदेशी खेळाडू स्पर्धेतील काही संघातून सामन्यातून बाहेर राहिले. बीसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मी नियमितपणे दुर्बार राजेशाहीच्या मालकाशी संपर्कात आहे. ते फक्त आश्वासन देतायत की मी सर्वांचे वेतन देण्याचा प्रयत्न करतोय. काल बांग्लादेशचे क्रीडा सल्लागार आसिफ महमूद त्याला भेटले आणि लवकरात लवकर खेळाडू आणि कर्मचाऱ्यांची थकबाकी देण्यास सांगितले. यावर फ्रेंचायझी दुर्बार राजेशाहीचे मालकांनी सहमती दर्शवली.