'महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरी इतकी मोठी नाही,' हेमा मालिनी यांचं वादग्रस्त विधान, 'आम्हीपण स्नान केलं अन्...'

भाजपा खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीला उगाच वाढवून सांगत असल्याचा आरोप केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 4, 2025, 04:59 PM IST
'महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरी इतकी मोठी नाही,' हेमा मालिनी यांचं वादग्रस्त विधान, 'आम्हीपण स्नान केलं अन्...' title=

Hema Malini on Maha Kumbh stampede: उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये (Prayagraj) झालेल्या महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत 30 लोकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान यावर भाजपाच्या खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. ही घटना तितकी मोठी नव्हती, जितकी वाढवून दाखली जात आहे असं हेमा मालिनी म्हणाल्या आहेत. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी चेंगराचेंगरीवर सभागृहात केलेल्या विधानावर प्रतिक्रिया होताना त्यांनी हे वक्तव्य केलं. महाकुंभमेळ्यात 29 जानेवारीला चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये 30 लोकांनी आपले प्राण गमावले. 

चुकीचं बोलणं हे अखिलेश यादव यांचं काम आहे अशी टीका हेमा मालिनी यांनी केली आहे. "खोटी माहिती देणं हे अखिलेश यादव यांचं कामच आहे. आम्हीदेखील कुंभमध्ये गेलो होतो. आम्हीदेखील संगममध्ये स्नान केलं. चेंगराचेंगरीची दु:खद घटना घडली. पण ती इतकी मोठी नव्हती. ती वाढवून सांगितली जात आहे," असं हेमा मालिनी म्हणाल्या आहेत.

यावेळी त्यांनी उत्तर प्रदेश सरकार अगदी योग्यरित्या महाकुंभमेळ्याचं नियोजन करत आहे असं सांगितलं. "अत्यंत योग्य प्रकारे मेळ्याचं नियोजन करण्यात आलं असून, प्रत्येक गोष्ट योग्य प्रकारे सुरु आहे. किती लाोक येत आहेत. हे सगळं हाताळणं कठीण आहे, पण आम्ही आमचं सर्वोत्तम करत आहोत," असं हेमा मालिनी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री प्रयागराजला जाऊन पवित्र स्नान करणार आहेत. जर परिस्थिती हाताबाहेर असती तर प्रधानमंत्री आले असते का? अशी विचारणाही त्यांनी केली. 

आदल्या दिवशी, अखिलेश यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, ज्यामध्ये 30 जणांचा मृत्यू झाला आणि 60 जण जखमी झाले. सरकार मृतांची खरी संख्या लपवत आहे असा आरोप त्यांनी केला आहे. चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना, आज त्यांनी योगी आदित्यनाथ यांना मृतांची खरी संख्या उघड करण्यास सांगितलं.

"सरकार सतत अर्थसंकल्पीय आकडेवारी देत ​​असताना, कृपया महाकुंभात मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी देखील द्या. महाकुंभाच्या व्यवस्थेबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची माझी मागणी आहे. महाकुंभ आपत्ती व्यवस्थापन आणि हरवलेल्या आणि सापडलेल्या केंद्राची जबाबदारी लष्कराकडे सोपवावी," असं अखिलेश यादव यांनी संसदेत बोलताना सांगितलं. अखिलेश यादव यांनी सत्य लपवणाऱ्या महाकुंभमधील अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली आहे.