'...तर 2 लाथा मारल्या असत्या'; BMC कर्मचाऱ्यांनी जात विचारल्याने संपातला पुष्कर जोग

Maratha Resevation : मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या सर्वेक्षणावरुन अभिनेता पुष्कर जोगने संताप व्यक्त केला आहे. महापालिका कर्मचाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नावरुन पुष्कर जोग संतापला आणि त्याने पुढच्यावेळी असा प्रश्न विचारला तर कानाखाली मारेल, असे म्हटलं.

आकाश नेटके | Updated: Jan 28, 2024, 03:12 PM IST
'...तर 2 लाथा मारल्या असत्या'; BMC कर्मचाऱ्यांनी जात विचारल्याने संपातला पुष्कर जोग title=

Maratha Resevation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांसह मुंबईच्या वेशीवर आंदोलन करत आपल्या मागण्या पूर्ण करुन घेतल्या आहेत. राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मध्यरात्री मान्य करत मध्यरात्री अध्यादेश काढला. या अध्यादेशात मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केल्याप्रमाणे सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे सरकारकडून मराठा समाजाला मागास सिद्ध करण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. या सर्वेक्षणावरुन मात्र नागरिकांनी टीका केली आहे. अभिनेता पुष्कर जोगनेही अशाच सर्वेक्षणावरुन रोष व्यक्त केला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 23 जानेवारीपासून मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. मात्र या सर्वेक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या प्रश्नावलीमुळे नागरिक संतप्त झाले आहे. लग्न जुळवताना हुंडा मागता का? तुमच्या महिला बुरखा घालतात का? नवसासाठी बळी देता का? असे प्रश्न नागरिकांना विचारले जात आहेत. सर्वेक्षणादरम्यान अभिनेता पुष्कर जोग याच्यासोबतही असाच काहीचा प्रकार घडला आहे.

मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून मराठा आरक्षणासाठी लोकांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं जात आहे. अभिनेता पुष्कर जोगच्या घरी देखील काही महापालिकेचे कर्मचारी सर्वेक्षणासाठी गेले होते. त्यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नामुळे पुष्कर चांगलाच संतापला. सोशल मीडियावर पोस्ट करत पुष्करने आपला रोष व्यक्त केला आहे.

काय म्हणाला पुष्कर जोग?

"काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्व्हे करतोय अशी माहिती देऊन माझी जात विचारत होते. त्या कर्मचारी जर बाईमाणूस नसत्या, तर 2 लाथा नक्कीच मारल्या असत्या…कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका, नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोगबोलणार," असे पुष्कर जोगने म्हटलं आहे.

Pushkar jog

प्रश्नावलीवर मराठा समाजाचा आक्षेप

तुमच्या समाजात विवाहित स्रियांनी डोक्यावर पदर घेतला पाहिजे असे बंधन आहे का?, विधवांना हळदी-कुंकवाला आमंत्रित करतात का?, विधवांना कपाळाला कुंकू लावण्याची, मंगळसूत्र घालण्याची मुभा आहे का?, विधुर पुरुषांचे पुनर्विवाह होतात का?, नवसासाठी कोंबडा/बकऱ्याचा बळी देण्याची पद्धत आहे का? तुमच्या कुटुंबात कोणाचा आंतरधर्मीय विवाह झाला आहे का? तुमच्या समाजात महिला पडदा/बुरखा वापरतात का? असे प्रश्न विचारल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. तर असे प्रश्न विचारून शासनाला खरंच आमचे मागासलेपण तपासायचे आहे की आम्हाला गुन्हेगार ठरवायचेय, हा अदृश्य कट आहे, असा सवालही मराठा समाजाकडून उपस्थित केला जात आहे.