Sankarshan Karhade Childhood Memories : मराठी नाट्यसृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता म्हणून संकर्षण कऱ्हाडेला ओळखले जाते. मराठी मनोरंजनसृष्टीतील बहुआयामी कलाकार म्हणून संकर्षण कऱ्हाडेला ओळखले जाते. संकर्षण कऱ्हाडने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. संकर्षणच्या अभिनयाचे, लिखाणाचे, दिग्दर्शनाचे, कवितांचे आणि त्याच्या सूत्रसंचालनाचे लाखो चाहते आहेत. सध्या संकर्षण हा तू म्हणशील तसं या नाटकात काम करताना दिसत आहे. आता संकर्षणने त्याच्या दोन्हीही मुलांचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने रविवारचा दिवस कसा असतो, याबद्दल भाष्य केले आहे.
संकर्षण कऱ्हाडेला सर्वज्ञ आणि स्रग्वी अशी दोन जुळी मुलं आहेत. तो अनेकदा त्याच्या मुलांसोबत वेळ घालवताना दिसतो. विशेष म्हणजे संकर्षण हा अनेकदा त्यांच्या फोटो शेअर करत किस्सेही शेअर करत असतो. आता संकर्षणने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या दोन्ही मुलांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याची दोन्हीही मुलं खिडकीतून बाहेर डोकावून बघत आहेत. त्यात ते संकर्षणला बाहेर खेळायला जायचं असं सांगताना दिसत आहेत.
हा व्हिडीओ शेअर करताना संकर्षणने त्याच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यात त्याने तो लहान असताना रविवारचा दिवस कसा असायचा, याबद्दल सांगितले आहे. "रविवार बाबांशी गप्पा मारत सुरू झाला. मी ह्यांच्याइतका लहान होतो तेंव्हा रविवार फार वेगळा होता…. मस्तं होता.. आख्खा आठवडा अंगावर घेतलेली धूळ आई किंवा आजी “लिरील” साबणाने घासून घासून काढायची…. ते डोळ्यात गेलं कि बोंबाबोंब, मग रंगोली पाहात पाहात चहाच्या कपात दूध, बोर्नव्हीटा आणि बिस्किटांचा लगदा करून खायचा…
मग “जंगल जंगल बात चलीं है पता चला है” मोगली, दूपारी छायागीत, जेवण झाल्यावर दूपारी रात्रीपेक्षाही गाढ झोपायचं, मग ४ वा. सह्याद्री वर मराठी सिनेमा (बनवा बनवी ) आणि संध्याकाळनंतरचा सग्गळा वेळ उद्या शाळा आहे ह्या दुःखात", असे कॅप्शन संकर्षणने या व्हिडीओला दिले आहे.
संकर्षणच्या या पोस्टवर कॉमेडिअन मंदार भिडेने कमेंट केली आहे. "मुलांना नवल वाटलं असेल विकेंडला बाबाला घरात बघून", अशी कमेंट त्याने केली आहे. त्यावर संकर्षणने "येतोय पार्ल्यातच... दुपारी 4 चा प्रयोग आहे", असे म्हटले आहे. त्यावर त्याने "आज मी नेमका पुण्यात आहे", अशी कमेंट केली आहे. तर अनेकांनी संकर्षणच्या पोस्टवर अगदी खरं असे म्हटले आहे.