मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वात नावारुपास आलेल्या अभिनेता kushal panjabi कुशल पंजाबी याने आत्महत्या केल्यानंतर साऱ्या कलाविश्वाने हळहळ व्यक्त केली. कुशलचं असं जाणं अनेकांनाच धक्का देऊन गेलं. मानसिक तणावातून त्याने आत्महत्या केल्याचं स्पष्ट होत आहे. कारकिर्दीत यशाच्या टप्प्यावर असतानाच कुशलनं उचललेलं हे पाऊन कलाकार मित्रांच्या मनालाही चटका लावून गेलं. याचविषयी एक पोस्ट लिहित अभिनेता सुयश टिळक याने आयुष्याची काहीच शाश्वती नाही, या शब्दांत दु:ख व्यक्त केलं.
'तो तंदुरुस्त होता, कायम हसत असायचा. कारकिर्दीत यशस्वीसुद्धा होता. आज त्याच्या आत्महत्येचं वृत्त मात्र धक्काच देऊन गेलं.
मित्रांनो, सर्वांशी कायम चांगल्या पद्धतीने वागा. तुमच्या जीवनात राहण्यासाठी, येण्यासाठी एखाद्याचे प्रयत्न ओळखा. पारदर्शी राहा. फक्त सोशल मीडिया किंवा कोणत्याही ऍपच्या माध्यमातूनच कोणाचे मित्र होऊ नका. खऱीखुरी मैत्री करा, खरीखुरी मिठी मारा. प्रत्यक्षात बोला. फक्त बोलण्यापुरताच नव्हे, तर प्रत्यक्षातही एकमेकांची साथ द्या. प्रत्येकाच्या भावनांची कदर करा.
समोर हसतमुख आणि अगदी सहजपणे वागणाऱ्या व्यक्तीच्या मनात, डोक्यात नेमकं काय सुरु आहे याची तुम्हाला कल्पनाही नसेल. त्यामुळे पुढच्या वेळी कोणाच्या अनुपस्थिती तुम्ही त्यांच्याविषयी बोलत असाल तर, तुम्ही त्यांचा विश्वासघात करत नाही ना; याची काळजी घ्या', अशी भावनिक आणि तितकीच खरी पोस्ट सुयशने लिहिली.
वाचा : कुशलच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री चिन्मयी सुमीतनं व्यक्त केली मनातली खदखद
वास्तवाशी अगदी जवळ नेणाऱ्या या पोस्टमध्ये त्याने आत्महत्या हा तणावातून मोकळं होण्याचा मार्ग नसल्याचं म्हणत सर्वांनाच त्यांच्या आत्पजनांशी बोलण्याचा सल्ला दिला आहे. फक्त सुयशच नव्हे, तर कलाविश्वातील इतरही कलाकारांनी कुशलच्या जाण्याचं दु:ख व्यक्त केलं. वरवर निरोगी, तंदुरुस्त आणि आनंदी दिसणाऱ्या कुशलच्या मनातील कोलाहल हा कोणालाच ठाऊक नव्हता, असं म्हणत हा आपल्यासाठी धक्काच असल्याचं मंदिरा बेदीने सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटलं.