Kshitee Jog On Mangalsutra : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणून अभिनेता हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांना ओळखले जाते. हेमंत आणि क्षिती यांनी 2012 मध्ये लग्नगाठ बांधली. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या लग्नाला 11 वर्षे पूर्ण झाली. क्षिती जोगला तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाते. आता क्षितीने मंगळसूत्र घालणे आणि न घालणे याबद्दल विचार मांडले आहेत.
क्षिती जोगने आरपार या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला मंगळसूत्र घालण्याबद्दलचे तिचे मत विचारण्यात आले. त्यावर तिने एका प्रसंगाची माहिती देत तिचे मत मांडले. यावेळी तिने लग्न झालेले पुरुष एखाद्या मुलीकडे पाहून ती किती चांगली दिसते हे म्हणतात, तेव्हा ते चालतं. पण लग्न झालेल्या स्त्रीने मंगळसूत्र न घालता गेलेलं चालत नाही, असा प्रश्नही उपस्थित केला.
"मी लग्न झाल्यानंतर एक-दीड वर्षांनी एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी मी मंगळसूत्र घातलं नव्हतं. तेव्हा काहींनी मला तू मंगळसूत्र घालत नाही, तुझं नुकतंच लग्न झालंय ना, असे प्रश्न विचारले. त्यावर मी त्यांना त्याला माहितीये ना मी त्याची बायको आहे आणि मला माहितीये की तो माझा नवरा आहे. तुला माहिती असो किंवा नसो, काय फरक पडतो मला?? ते घातल्याने काय होणार आहे." असे क्षिती जोगने म्हटले आहे.
"मला मंगळसूत्र खूप आवडतं. मंगळसूत्र हा सर्वोत्तम दागिना आहे. पण ते माझ्या मनावर आहे. माझ्या मनात असेल तेव्हा मी साडी, गजरा, टिकली हे सर्व करते. नाहीतर तर नाही. मी हे तुमच्यासाठी करत नाही. माझ्यासाठी करते. मला माहितीये माझं लग्न झालंय, मंगळसूत्र घातलं काय किंवा न घातलं काय याने मला फरक पडत नाही. त्याला तुम्ही जाऊन का विचारत नाही की अरे तुझं लग्न झालंय, ती मुलगी किती चांगली दिसते असं का म्हणालास तू. असं होत नाही ना. तो सहज गप्पा मारतो ती मुलगी किती चांगली दिसते, ते चालतं. असे काही लोक असतात. त्यांच्याकडे खूप वायफळ वेळ असतो. घरी वेळीच आईने धपाटे दिले असते तर ही वेळ आली नसती", असा किस्सा क्षिती जोगने सांगितला.
क्षिती जोगचा या मुलाखतीदरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकरी कमेंट करत तिला ट्रोल करताना दिसत आहेत. यावर एकाने मग हे सल्ले आपल्या पुरते ठेवायचे..... कशाला publically सांगायचं......??? दुसऱ्यांना वेल्ले म्हणल्याने आपण खूप cool वाटतो तर to स्वतःबद्दलचा गैरसमज आहे...., अशी कमेंट केली आहे. तर एकाने ॲक्टर झालं की उगाच आपण खूप पाश्चिमात्य असल्या सारखं वागायचं...., असेही म्हटले आहे.