मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दररोज विमानतळावर स्पॉट होत असतात. अलीकडेच अभिनेत्री चित्रांगदा सिंगनेही विमानाने प्रवास केला. मात्र या प्रवासादरम्यान तिच्यासोबत गैरवर्तन घडलं आणि तिने ही बाब तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केली. तिची ही पोस्ट वाचल्यावर असं वाटतं आहे की, तिला योग्य वागणूक न मिळाल्याने अभिनेत्रीला खूप वाईट वाटलं आहे.
चित्रांगदा नाराज
चित्रांगदा सिंग नुकतीच गो एअरमध्ये प्रवास करत होती आणि यादरम्यान अभिनेत्रीला एअर होस्टेसच्या वागण्याचा इतका राग आला की, अभिनेत्रीने तिला असभ्य म्हणून संबोधलं. निराश झालेल्या अभिनेत्रीने विमानाच्या आतून काही व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती एअरहोस्टेसची वाईट वागणूक दाखवताना दिसत आहे. यासोबतच तिचा वाईट अनुभव शेअर करत अभिनेत्रीने राग व्यक्त केला आहे. फ्लाइटमधील एक व्हिडिओ शेअर करत, अभिनेत्रीने असभ्य एअर होस्टेसला फटकारलं आणि म्हटलं की मी खूप निराश आहे.
सोशल मीडियावर व्यक्त केला राग
चित्रांगदा सिंगने इंस्टा स्टोरीवर लिहिलं, 'मुंबई ते दिल्ली फ्लाइट 391 ही गोएअरमधील आतापर्यंतची सर्वात वाईट एअरहोस्टेस आहे!!! #rikusingh#jamie & #christopher#meenal कृपया तिला काही शिस्त शिकवा. एवढी उद्धट आणि गर्विष्ठ वृत्ती मी कधीच पाहिली नाही! मी खूप निराश आहे. मला एअर इंडियाच्या माझ्या सर्वात वाईट अनुभवाची ही आठवण नेहमी करून देईल. यानंतर चित्रांगदाने तिच्या पुढच्या स्टोरीत स्पष्टीकरण देत लिहिलं की, ''ही घटना माझ्यासोबत नाही तर माझ्या शेजारी बसलेल्या व्यक्तीसोबत घडली आहे. तो माणूस आजारी होता आणि तरीही एअर होस्टेसशी अतिशय नम्रपणे बोलत होता. पण क्रूने त्याला चांगली वागणूक दिली नाही.
सुरु झाली चौकशी
अभिनेत्री चित्रांगदा सिंगने तिच्या पोस्टमध्ये फ्लाइटविरोधात लिहून त्या एअर होस्टेस नाव उघड केलं आहे. त्यानंतर आता फ्लाइट कंपनीने अभिनेत्रीसोबत गैरवर्तन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचं आश्वासनही दिलं आहे. चित्रांगदा सिंगसोबत गैरवर्तन करणाऱ्या सगळ्या एअर होस्टेसची चौकशी सुरू करण्यात आली आहे. फ्लाइटच्या प्रवक्ताने ही माहिती दिली आहे. याचबरोबर त्यांनी चित्रांगदा सिंगसोबत घडलेल्या संपूर्ण प्रकाराबद्दल माफी मागितली आहे.