Nana Patekar Interview: अभिनेते नाना पाटेकर हे आपल्या उत्कृष्ट अभिनयासोबतच सामाजिक कामे आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या माध्यमातून सुरु असलेल्या नाम फाऊंडेशनचे काम राज्यभरात मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. आपण आता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. आतापर्यंत समाजाने मला खूप काही दिलं. ते समाजाला परत करण्याची वेळ असल्याचे नाना यांनी सांगितले. झी 24 तासच्या ब्लॅक अॅण्ड मुलाखतीत त्यांनी दिलखुलास चर्चा केली. यावेळी त्यांनी आपला मुलगा मल्हारसोबतची एक आठवण शेअर केली.
समाजातून सर्वकाही ओरबाडणारे, लाखोंची संपत्ती गोळा करणाऱ्या राजकारण्यांवर नाना पाटेकर यांनी टीका केली आहे. कोणाचेही नाव न घेता त्यांनी राजकारण्यांवर निशाणा साधला. इतके ओरबाडून तुम्ही कुठे घेऊन जाणार आहात? आपला जाण्याचा दिवस कोणाला माहिती नसतो. इतका संपत्ती गोळा करण्याचा हव्यास का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यावेळी आपण आपल्या आयुष्यात आनंदी असल्याचे त्यांनी सांगितले. माझा मुलगा मल्हार मला म्हणतो, बाबा सर्वकाही देऊन टाक 'नाम'ला. माझी अशी मुलं आहेत याचा मला आनंद आहे. मकरंद थोरल्या मुलाप्रमाणे काम करतोय. त्याने नामच्या कामात स्वत:ला झोकून दिलं असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
राजकारण्यांना मतदार म्हणून तुमची आमची भीती राहिली नाही. मतपेटीसोबतच व्यक्त होणं देखील गरजेचे असल्याचे ते म्हणाले. विरोधक असताना जेवढे देशभक्त असता तेवढे तुम्ही सत्तेत असताना नसता, असा टोला त्यांनी राजकारण्यांना लगावला.
संस्थेच्या एका कामासाठी मी अमित शाह यांच्याकडे गेलो होतो. या फाइलचे काम झाले तर विदेशातून मिळणाऱ्या निधीत अडचण येणार नाही, असे त्यांना मी सांगितले. त्यानंतर त्यांनी संध्याकाळपर्यंत हे काम झाले पाहिजे असे एकाला सांगितले. तसे झालेही. मी स्वत:साठी कधीच काही मागत नाही. मला आयुष्यात सर्वकाही मिळाले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. परतीच्या वाटेने जाताना मला कोणत्याच गोष्टीची खंत नाही. जेवढी अपेक्षा ठेवली होती त्यापेक्षा जास्त समाजाने दिल्याचे ते सांगतात.
मला शिवसेना फुटल्यावर वाईट वाटलं. कॅमेरा झाल्यानंतर मी नट असतो, नाहीतर मी सामान्य नागरिकच आहे. मी बाळासाहेबांपासून ते सर्वांशी माझं नात होतं. जयदेव, राज सर्वांशी होतं. आता परिस्थिती अशा झालीये की आम्ही आता कोणाकडे पहायचं? तुमच्यामुळे आमच्या घरी चार मत पडतात, असं नाना पाटेकर म्हणतात. त्यावेळी नाना पाटेकर यांनी बाळासाहेबांची आठवण काढली.'
बाळासाहेब मला फोन करून बोलायचे. गाढवा काय करतोस रे असं म्हणायचे... आता ते नातं तसं राहिलं नाही. माझी आणि राजचं बोलणं होतं. पण मी ते आधीसारखं राहिलं नाही. बाळासाहेब गेल्यानंतर मातोश्रीशी संबंध संपलं. पहिल्यासारखं नातं आता राहिलं नाही, असं म्हणत नाना पाटेकर यांनी भावना व्यक्त केली आहे.