मुंबई : गेल्या काही दिवसांपासून 'पानिपत' चित्रपटाच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहेत. प्रदर्शनाआधीच चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. चित्रपटानंतर आता 'पानिपत'चे दिग्दर्शक अशुतोष गोवारीकर यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. ऐतिहासिक कथेवर आधारलेल्या 'पानिपत' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला धमक्या मिळत आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी २०० पोलिसांची फौज तैनात करण्यात आल्याची माहिती आहे.
कोणताही ऐतिहासिक चित्रपट जेव्हा रूपेरी पडद्यावर दाखल होण्यासाठी सज्ज होतो, तेव्हा तो नेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकतो असा इतिहासच आहे. 'पद्मावत', 'तानाजी' या चित्रपटांवर देखील आक्षेप घेण्यात आला होता. असचं काही अशुतोष गोवारीकर यांच्या सोबत देखील होत आहे.
दरम्यान, 'लगान', 'जोधा-अकबर', 'मोहन जोदाडो' यांसारखे ऐतिहासिक चित्रपट साकारले आहेत. 'जेव्हा ऐतिहासिक चित्रपट साकारले जातात, तेव्हा कथेत कोणत्या भागावर जास्त लक्ष केंद्रीत करण्यात येणार यावरून वाद होणार स्वाभाविक आहेत. इतिहास फार मोठा आहे. परंतु प्रत्येक गोष्ट पडद्यावर दाखवणं शक्य नसतं.' असं वक्तव्य अशुतोष गोवारीकर यांनी केलं.
चाहत्यांसाठी 'पानिपत' बऱ्याच कारणांनी खास ठरणार हे नक्की. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटात्या भव्यतेचा अंदाज लावता येत आहे. त्यातही, रवींद्र महाजनी आणि गश्मीर महाजनी ही वडील- मुलाची जोडी पडद्यावर मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वाच्या व्यक्तीरेखा साकारत आहेत.
'पानिपत'च्या युद्धाला केंद्रस्थानी ठेवत साकारण्यात येणारा हा चित्रपट ६ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून अभिनेता संजय दत्त अहमद शाह अब्दालीची भूमिका साकारणार आहे.