मुंबई : अभिनेत्री, सूत्रसंचालिका, नृत्यांगना पूर्वी भावेने लोकप्रिय 'गेम ऑफ थ्रोन्स'च्या थीमवर सुंदर नृत्य केलं आहे. या मालिकेला पूर्वी भावेने भरतनाट्यम करून मानवंदना दिली आहे. पूर्वी म्हणते, 'मी या मालिकेची खूप मोठी चाहती आहे. 'गेम ऑफ थ्रोन्स'ची ही थीम कुठेही कानावर पडली, तरी माझे कान टवकारले जातात. हे संगीत जेव्हा माझ्या कानावर पडायचं, तेव्हा मी मनात याचं नृत्य दिग्दर्शन स्वत:चं करून ठेवलं होतं. जेव्हा शेवटच्या सिझनची घोषणा झाली, तेव्हा काही दिवस 'ब्रेक ऑफ रिएलिटी' हे गाणं माझ्या मनात रूंजी घालत होतं'.
पूर्वी म्हणते, 'मी काही दिवसापासून समकालीन भरतनाट्यमची एक मालिका यूट्यूबवर प्रस्तूत करण्याचं नियोजन करत होते. मग मनात आलं की, ‘ब्रेक ऑफ रिएलिटी’ या 'गेम ऑफ थ्रोन्स'च्या थीमवर पहिलं नृत्य सादर केलं पाहिजे, आणि ही कल्पना आता सत्यात उतरवली'.
पूर्वी म्हणते यामागे आणखी एक उद्देश असा आहे की, 'शास्त्रीय नृत्य कला, आजच्या तरूणाईला आपलीशी वाटली पाहिजे. हाच उद्देश माझा समकालीन शास्त्रीय नृत्य मालिकेची निर्मिती करण्यामागे आहे. तसेच ‘गेम ऑफ थ्रोन्स’ला निवडण्यामागे आणखी एक कारण आहे. भरतनाट्यममध्ये युद्ध, पक्षी, प्राणी यावर खूप सुंदर मुद्रा आहेत. या शैलीतून ड्रॅगन, व्हाईट वॉकर्स यासारख्या गोष्टी चांगल्या पद्धतीने मांडल्या जावू शकतात.'
‘गेम ऑफ थ्रोन्स’ ह्या वेबमालिकेचे जगभरात असंख्य चाहते आहेत. ह्यात अनेंक बॉलीवूड आणि मराठी सिनेसृष्टीतले कलाकारही सामिल आहेत. गेले अनेक दिवस हे चाहते शेवटच्या सिझनची मालिका येण्याची वाट पाहत होते. आणि मालिका आल्यावर ती पाहतानाचे फोटो आणि व्हिडीओज अनेकांनी सोशल मीडिवरून शेअरही केले.