Raj Thackeray on Swargandharva Sudhir Phadke : स्वरगंधर्व सुधीर फडके... मराठी घराघरांत आणि मनामनात पोहोचलेले एक अजरामर नाव. मराठीसह हिंदी गायक, संगीतकार म्हणून त्यांनी संगीतप्रेमींच्या मनात एक ठसा उमटवला. पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या गायकीनं आणि संगीतानं सगळ्या प्रेक्षकांना तृप्त केलं. 'गीतरामायणा'तील गोडव्यानं, भावविभोर गीतांनी 'बाबुजीं'नी मराठी मनावर राज्य केलं. अशा या रसिकमनाचा ठाव घेणाऱ्या 'बाबुजीं'ची जीवनगाथा सांगणारा 'स्वरगंधर्व सुधीर फडके' हा चित्रपट येत्या 1 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. रामनवमीच्या पूर्वसंध्येला या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा राज ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी चित्रपटातील टीमसह अन्य मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात चित्रपटातील ’गीतरामायण’मधील बहारदार गाण्यांची झलकही पाहायला मिळाली. तर राज ठाकरे यांनी या चित्रपटाचा ट्रेलर पाहून त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे ट्रेलरचं कौतुक करताना म्हणाले, ‘’मला बाबुजींचा सहवास फारसा लाभला नाही. परंतु माझ्या वडिलांचं आणि बाबुजींचे जवळचे संबंध होते. बाबुजींना जवळून भेटण्याचा योग आला नाही. बहुदा हा योग सुनिल बर्वेंमुळे येईल. बाबुजींची सगळीच गाणी अजरामर आहेत. त्यांच्या गाण्यांची खासियत म्हणजे एखाद्याला नवसंजीवनी देणे. उभारी देणे. मला खात्री आहे, या चित्रपटाला नक्कीच प्रेक्षकांची पसंती मिळेल.’’
हा चित्रपट म्हणजे आजवरचा सर्वात भव्य स्वरमयी बायोपिक ठरणार आहे. तर या चित्रपटाच्या निमित्तानं बाबुजी आणि त्यांच्यासोबत गायलेल्या अनेक नामवंताच्या असंख्य गाजलेल्या गाण्यांना चित्रपटगृहात नव्यानं अनुभवण्याची पर्वणी या कलाकृतीच्या माध्यमातून मिळणार आहे. या चित्रपटात एकूण 27 गाणी असून या चित्रपटाच्या माध्य्मातून प्रेक्षकांना संगीत नजराणा मिळणार आहे. सौरभ गाडगीळ प्रस्तुत रिडिफाईन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे निर्माते आहेत. सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस, चिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धीरेश जोशी, परितोष प्रधान यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट योगेश देशपांडे यांनी दिग्दर्शित केला असून चित्रपटाची कथा, पटकथा, संवादही त्यांचेच आहेत.