दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा' चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला तेव्हा त्याने बॉक्स ऑफिसवर वादळ आणलं होतं. सुकूमार यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाने जगभरात कमाईचे नवे रेकॉर्ड प्रस्थापित केले होते. अल्लू अर्जूनचा अभिनय, गाणी, डान्स यांनी फक्त भारतीयच नाही तर विदेशातील प्रेक्षकांनाही वेड लावलं होतं. चित्रपटातील डायलॉग्स आणि सिग्नेचर स्टेप तर प्रचंड व्हायरल झाले होते. 'पुष्पा' चित्रपट दोन भागात असल्याने तो प्रदर्शित झाल्यानंतर त्याचा पुढील भाग कधी येणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. दरम्यान 'पुष्पा 2' (Pushpa 2) चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून चाहते आतुरतेने त्याचा रिलीजची वाट पाहत आहेत.
'पुष्पा 2' चित्रपटाच्या प्रमोशनला निर्मात्यांनी सुरुवात केली आहे. 15 ऑगस्टला हा चित्रपट संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे. 'पुष्पा 2' देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल अशी निर्मात्यांना अपेक्षा आहे. तसंच भरघोस कमाई करेल अशी आशा आहे. पण चित्रपट रिलीज होण्याआधीच निर्मात्यांनी मोठी कमाई केली आहे. निर्मात्यांना उत्तर भारतात एक मोठी डील मिळाली आहे.
रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2' च्या निर्मात्यांनी उत्तर भारतातील चित्रपटाचे डिजिटल राईट्ससंबंधी मोठी डील केली आहे. अनिल थडानी यांच्यासह ही डील करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अनिल थडानी यांनी चित्रपटाचे डिजिटल हक्क खरेदी करताना मोठी रक्कम मोजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रवीना टंडनच्या पतीने 'पुष्पाः द रूल'च्या निर्मात्यांना 200 कोटींच्या अँडव्हान्स बुकिंगच्या आधारे त्याचे रिलीज हक्क खरेदी केले आहेत. 'पुष्पा 2' यावर्षी सर्वाधिक उत्सुकता असणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपट वितरक अनिल थडानीने सुकुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या या अॅक्शनपटाचे रिलीज हक्क खरेदी करण्यासाठी 200 कोटींचं अॅडव्हान्स पेमेंट केलं आहे.
पुष्पाचे निर्माते सर्व भाषांमधील थ्रिटिकल हक्कांसाठी 1,000 कोटी रुपये किंवा त्याहून अधिकची मागणी करत आहेत. 'पुष्पा 2' चित्रपटाच्या निर्मितीसाठी 500 कोटींपेक्षा अधिक मोजण्यात आले आहेत. निर्मात्यांनी जगभरातील संगीत हक्क आणि हिंदी सॅटेलाइट हक्क टी-सीरीजला 60 कोटी रुपयांना विकले आहेत.
तेलुगू सॅटेलाइट हक्क 'स्टार मा'ने विकत घेतले आहेत आणि OTT दिग्गज Netflix ने चित्रपटाचे डिजिटल स्ट्रीमिंग अधिकार 100 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. तथापि, निर्मात्यांनी अद्याप या वृत्तांवर प्रतिक्रिया दिलेली नाही.