मुंबई : बॉलिवूड बादशाह किंग खान शाहरुखचे गेल्या काही चित्रपटांनी बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली नसली तरी किंग खानची चर्चा मात्र कमी झालेली नाही. शाहरुख खानच्या चित्रपटांमुळे टेलिव्हिजनवरील चॅनेलला चांगला टीआरपी मिळतो. त्यामुळे शाहरुखच्या चित्रपटांसाठी सॅटेलाईट राइट्स खरेदी करण्यासाठी स्पर्धा सुरू असते. शाहरुखने त्याच्या २२ चित्रपटांच्या सॅटेलाईट राइट्सची कोट्यावधी रूपयांची डील केल्याचे समोर आले आहे.
शाहरुखचं स्टारडम चाहत्यांमध्ये आजही तितकंच आहे. एका चॅनेलने शाहरुखच्या २२ चित्रपटांचे सॅटेलाईट राइट्स खरेदी केले आहेत. स्वदेश, ओम शांती ओम, दिलवाले, चेन्नई एक्सप्रेस, हॅप्पी न्यू इयर, फिर भी दिल है हिंदुस्तानी, डियर जिंदगी यांसारख्या २२ चित्रपटांचे राइट्स खरेदी केले आहेत.
बॉलिवूड चित्रपटांबाबत आतापर्यंतची झालेली ही सर्वात मोठी सॅटेलाईट खरेदी मानली जात आहे. या डीलमधील मोठा हिस्सा शाहरुखलाही देण्यात येणार आहे. सॅटेलाईट राइट्सची खरेदी किती कोटींमध्ये झाली याबाबत अद्याप खुलासा करण्यात आला नाही परंतु या खरेदीसाठी मोठी रक्कम मोजण्यात आल्याची चर्चा आहे. या डीलमध्ये शाहरुखच्या जुन्या चित्रपटांचे राइट्सही खरेदी करण्यात आले आहेत. पहेली, बिल्लू, चमत्कार, अंजाम, राम जाने यांसारख्या जुन्या चित्रपटांचाही समावेश आहे.