मुंबई : किशोर कुमार हे अगदी तरुणांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत खूपच प्रसिद्ध आहेत. त्यांची गाणी आजही ओठांवर गुणगुणली जातात. गाणी तीच फक्त त्याचं थोडं स्वरुप बदललं आहे. थोडक्यात सांगायचं तर अनप्लग व्हर्जनमध्येही आज किशोरदांची गाणी गायली जातात.
सर्वांना आवडणाऱ्या किशोर कुमार यांची गाणी मात्र एकेकाळी आकाशवाणीवर न लावण्याचा फतवा काढण्यात आला होता. तो किस्सा नेमका काय होता. हा फतवा काढला हा किस्सा फार कमी लोकांना माहीत आहे.
किशोरदा आणि संजय गांधींचा तो किस्सा
देशात 1975 मध्ये आणीबाणीच्या काळात संजय गांधी यांनी मुंबईतील प्रसिद्ध निर्माते आणि संगीत क्षेत्रातील दिग्गजांना दिल्लीतील एका कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं. त्यावेळी किशोर कुमार त्या कार्यक्रमाला अनुपस्थित होते.
किशोर कुमार अनुपस्थित राहणार याची पूर्वकल्पनाही देण्यात आली नव्हती. कार्यक्रम संपल्यावरही त्यांनी कार्यक्रमाला का हजेरी लावली नाही याचं कोणतंही स्पष्टीकरण दिलं नव्हतं. या सगळ्या घटनेनंतर संजय गांधी यांनी एक मोठा निर्णय घेतला.
किशोर कुमार यांच्या गाण्यांवर बंदी
संजय गांधी यांनी निरोप देऊनही किशोर कुमार कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याने आणि स्पष्टीकरण न दिल्याने त्यांनी वैयक्तिक अपमान मानला. संजय गांधी यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री विद्याचरण शुक्ला यांना फोन केला. किशोर कुमार यांची कोणतीही गाणी आकाशवाणीवर लावण्यात येऊ नयेत असा फतवा काढला.
याचा परिणाम असा झाला की ऑल इंडिया रेडिओवर किशोर कुमारची गाणी वाजणे बंद झाली. किशोर कुमारने गाणी गायलेल्या चित्रपटांना सेन्सॉरने प्रमाणपत्र देण्यास नकार देण्यात आला. किशोर कुमार आणि संजय गांधी यांच्यातील हा किस्सा फार कमी लोकांना माहीत आहे.