Sankarshan Karhade Chala Hawa Yeu Dya programme : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय विनोदी कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम म्हणजे चला हवा येऊ द्या. गेल्या 10 वर्षांपासून ‘झी मराठी’ वाहिनीवरील हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमामुळे अनेक कलाकार हे घराघरात पोहोचले. गेल्या अनेक वर्षांपासून 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचे निवेदन डॉ. निलेश साबळे करत आहे. पण सध्या या कार्यक्रमाचे निवेदन अभिनेता संकर्षण कऱ्हाडे करताना दिसत आहे. नुकतंच याबद्दल संकर्षण कऱ्हाडेने भाष्य केले आहे. यावेळी त्याने डॉ. निलेश साबळेची जागा घेण्याबद्दलही वक्तव्य केले.
“हसताय ना…हसायलाच पाहिजे”, असं म्हणत घराघरात पोहोचलेला निवेदक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून निलेश साबळेला ओळखले जाते. निलेश साबळेने काही दिवसांपूर्वी ‘चला हवा येऊ द्या’मधून एक्झिट घेतली. तब्येतीच्या कारणास्तव थोडे दिवस मी कार्यक्रमातून बाहेर असेन, असं निलेश साबळेने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते. त्यानंतर आता अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचे निवेदन करताना दिसत आहे.
यानिमित्ताने संकर्षणने 'इट्स मज्जा' या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला 'चला हवा येऊ द्या'चे निवेदन करण्याबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. तसेच निलेश साबळेची जागा घेण्याबद्दलही त्याने वक्तव्य केले. यावेळी तो म्हणाला, "मी या कार्यक्रमाचा पूर्ण वेळ निवेदक नाही. माझा मित्र डॉ. निलेश साबळे याची ही जागा आहे. निलेश साबळेच या कार्यक्रमाचे सूत्रधार, लेखक, दिग्दर्शक आहेत. त्यामुळे निलेश साबळेची जागा आमच्यापैकी कुणीही घेऊ शकत नाही."
"मी या कार्यक्रमाचा पाहुणा निवेदक आहे. मी काही दिवसांपूर्वी जेव्हा या कार्यक्रमात आलो होतो, तेव्हा चला हवा येऊ द्या ला १० वर्ष पूर्ण झाली होती. पण आता हा कार्यक्रम निरोप घेतो आहे. तर त्याच्या निरोप समारंभासाठी मी पाहुणा निवेदक म्हणून आलो आहे. मी या कार्यक्रमाचा पूर्णवेळ निवेदक नाही. माझी मनापासून तशी इच्छाही नाही. याचे मुख्य कारण म्हणजे चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम म्हटलं की निलेश साबळे हाच निवेदक म्हणून प्रेक्षकांच्या मनात आहे. त्यामुळे त्याची या कार्यक्रमातील जागा वेगळी आहे आणि त्याने ती पक्की केली आहे", असे संकर्षण कऱ्हाडेने म्हटले.
"मी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचे तात्पुरत्या स्वरुपाचे निवेदन करणार आहे. यावेळी मी झी मराठीवर नव्याने सुरु होणाऱ्या 'शिवा', 'पारू', 'नवरी मिळे हिटलरला' आणि 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकेतील कलाकारांशी गप्पा मारणार आहे. या कार्यक्रमाची एक वेगळी जागा आहे आणि त्यासाठी निलेश साबळे हा उत्तम व्यक्ती आहे", असेही संकर्षण कऱ्हाडे म्हणाला.