भिवंडीतील पांडवगडावरील पुरातन शिवलिंग व पादुका गायब, वनविभागाने...

Bhiwandi Shivling News: भिवंडीतील पांडवगडावरील कुंडात पुरातन शिवलिंग सापडले होते. मात्र आता ते शिवलिंग ताब्यात घेण्यात आलं आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 16, 2025, 08:26 AM IST
भिवंडीतील पांडवगडावरील पुरातन शिवलिंग व पादुका गायब, वनविभागाने...  title=
mahashivratri 2025 forest department takes shivling found in bhiwandi

झी मीडिया, उमेश जाधव

Bhiwandi Shivling News: काही दिवसांपूर्वी भिवंडीतील पांडव गडावर पुरातन शिवलिंग व पादुका सापडल्या होत्या. महाशिवरात्रीच्या आधीच शिवलिंग सापडल्याने परिसरात एकच उत्साह पसरला होता. मात्र, एकाएकी पुरातन शिवलिंग आणि पादुका गायब झाल्या आहेत. वनविभागाने‌ कोणत्याही प्रकारची सूचना न देता व कोणालाही विश्वासात न घेता शिवलिंग आणि पादुका ताब्यात घेतल्या आहेत. 

भिवंडी तालुक्यातील पांडवकालीन पांडव गडावरील कुंडात साफसफाई दरम्यान गुरुवारी पुरातन शिवलिंग व पादुका सापडल्या होत्या. महाशिवरात्रीच्या पर्वकाळात पुरातन शिवलिंग सापडावं ही एक पर्वणीच म्हणावी म्हणून वाहुली गावातील भिवंडी तालुक्यातील जनतेत भक्तीमय व आनंदी वातावरण निर्माण झालं होतं. परंतु शुक्रवारी वनविभागाने वाहुली ग्रामस्थ, ग्रामपंचायत व साफसफाई दरम्यान असणाऱ्या तरुणांना ही विश्वासात न घेता परस्पर शिवलिंग व पादुका कुंडातून हालविण्यात आल्या आहेत.  

वनविभागाने शिवलिंग आणि पादुका कुंडातून का हलवल्या याचा सर्वांनाच प्रश्न पडाला आहे. वनविभागाने आमच्या भावना दुखावल्या असून आमच्या भावनांशी खेळ केला असल्याच्या कडवट प्रतिक्रिया व संताप व्यक्त होत आहे. शिवरुपानंद स्वामी यांनी विरोध दर्शविला पण वनविभागाने त्यांचही काही एक ऐकलं नाही. प्रशासनाने शिवलिंग व पादुका ग्रामस्थांच्या स्वाधीन कराव्यात व आम्हाला देवाचं मंदिर स्थापन करून पुरातन परंपरा जोपासण्याची संधी द्यावी आणि आमचं नेलेलं शिवलिंग आम्हाला परत करावं व यंदाचा महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न व्हावा अशी मागणी येथून होत आहे.

काय आहे प्रकरण?

भिंवडी तालुक्यातील वाहुली गावालगतच्या पांडव गडावरील पांडव कुंड साफ-सफाई करण्यासाठी वाहुली गावातील तरूण गेले असताना साफ-सफाई दरम्यान कुंडातील पाणी व गाळ काढत असताना अचानक कुंडाच्या तळाशी पुरातन असे भग्न अवस्थेत शिवलिंग व पादुका आढळून आल्या आहेत. हे दृश्य पाहून तरुणांना आश्चर्याचा धक्का बसला.  शिवलिंग सापडल्याची बातमी पसरताच परिसरातील भाविकांनी पांडवगडावर धाव घेतली होती. यंदाच्या शिवरात्रीला या ठिकाणी १११ महारुद्र जलाभिषक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार होतं. तसंच शिवलिंग सापडल्यानं यंदा भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याचं भाकित वर्तवलं जात होतं.