मुंबई : बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर आपल्या नकारात्मक भूमिकांसाठी प्रसिद्ध आहेत. चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेसाठी शक्ती कपूर यांचं नाव अग्रस्थानी असतं. नुकतंच, 'द कपिल शर्मा शो'मध्ये शक्ती कपूर यांनी बॉलिवूडमध्ये महत्त्वाची भूमिका मिळाल्याबाबतचा एक किस्सा शेअर केला आहे.
शक्ती कपूर यांनी, १९८० मध्ये 'कुर्बानी' चित्रपटात त्यांना पहिला रोल मिळाल्याचं सांगितलं. या भेटीबाबत बोलताना शक्ती कपूर यांनी सांगतिलं की, एकदा त्यांच्या कारची अचानक एका मर्सिडीजशी टक्कर झाली. ते गाडीतून बाहेर आले आणि त्यांनी मर्सिडीजमधून एक हॅंडसम व्यक्ती बाहेर येताना पाहिला. आणि ते फिरोज खान होते. त्यांनी फिरोज खान यांना पाहिलं आणि त्यांना, 'सर..माझं नाव शक्ती कपूर आहे, मी पुणे फिल्म इंस्टिट्यूटमधून आहे. मी अॅक्टिंगमध्ये डिप्लोमा केला आहे. कृपया मला तुमच्या चित्रपटात एक रोल द्या' असं म्हटलंय.
या घटनेनंतर शक्ती कपूर त्यांच्या एका मित्राला भेटण्यासाठी गेले. शक्ती कपूर यांचा के. के. शुक्ला हा मित्र फिरोज खान यांच्यासोबत 'कुर्बानी' चित्रपटासाठी काम करत होता.
शक्ती कपूर आणि के. के. शुक्ला यांची भेट झाली त्यावेळी शुक्लाने शक्ती कपूर यांना, फिरोज खान चित्रपटासाठी एका नव्या व्यक्तीच्या शोधात आहेत, तो व्यक्ती पुण्याच्या फिल्म इंस्टिट्यूटमधील आहे आणि त्याच्या गाडीची फिरोज खान यांच्या गाडीशी टक्कर झाल्याचंही त्याने सांगितलं. त्यानंतर शक्ती कपूर यांनी उत्साहात तो व्यक्ती मीच असल्याचं म्हटलं.
त्यानंतर शुक्लाने फिरोज खान यांना फोन केला आणि अशाप्रकारे त्यांना 'विक्रम' नावाचा महत्त्वाचा रोल मिळाल्याचं शक्ती कपूर यांनी सांगतिलं.
ज्या चित्रपटासाठी अशाप्रकारे पहिला ब्रेक मिळाला तो १९७९ मध्ये आलेला 'सरगम' चित्रपट होता. त्यानंतरही त्यांनी अनेक चित्रपटांतून काम केलं मात्र त्यांना तशी ओळख मिळाली नाही. 'सरगम'नंतर १९८१ मध्ये 'रॉकी' चित्रपटातून महत्त्वाची भूमिका मिळाली.