Sidharth Shukla Death: मनोरंजन जगताला गुरुवारी जाग आली तीच मुळात एका अतिशय धक्कादायक बातमीनं. ही बातमी होती अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्या निधनाची. वयाच्या 40 व्या वर्षी हा हरहुन्नरी चेहरा आपल्यातून निघून गेला आणि सर्वांच्याच पायाखालची जमिन सरकली.
कारकिर्दीत आपल्या वाट्याला आलेल्या प्रत्येक आव्हानाचं तोंड देत, आलेली प्रत्येक भूमिका समर्पकतेनं बजावत सिद्धार्थ आपलं असं एक वेगळं साम्राज्य निर्माण करण्याच्या कामात गुंतला. यशाची एक-एक पायरी चढत असताना सिद्धार्थनं काही गोष्टींची साथ मात्र सोडली नव्हती. या साऱ्या प्रवासामध्ये त्याच्या जीवनातील प्रत्येक निर्णयामध्ये एका खास व्यक्तीची त्याला साथ आणि भक्कम आधार होता. ही व्यक्ती म्हणजे सिद्धार्थची आई.
आई, प्रत्येकाच्याच आयुष्यात महत्त्वाच्या स्थानी असते, किंबहुना तिच आपल्याला घडवते. सिद्धार्थसाठी त्याची आई म्हणजे खास मैत्रीण, आधारस्तंभ आणि शब्दांतही मांडता येणार नाही अशी एक व्यक्ती होती. सिद्धार्थसाठी आयुष्यात जर कोणती गोष्ट अधिक कठीण होती, तर ती म्हणजे त्याच्या आईपासून दूर राहणं.
एका मुलाखतीमध्ये सिद्धार्थनं (Sidharth Shukla mom) त्याच्या आईसोबतच्या नात्यावरुन पडदा उचलला होता. त्याच्या स्मरणार्थ 'ह्युमन्स ऑफ बॉम्बे' या पेजवरुन त्याच्याच मुलाखतीचा काही भाग शेअर करण्यात आला. जिथं सिद्धार्थ म्हणालेला, 'लोकं मला काहीसा गंभीर स्वभावाचा, म्हणून ओळखतात. पण, आईचा विषय येतो तिथं मी कायमच नरमतो. तीन भावंडांमध्ये मी सर्वात लहान होतो त्यामुळं कायमच आईच्या अवतीभोवची असायचो. लहान असताना तर तिच्यापासून दूर गेल्यावर मी रडायचो. मग चपात्या करतानाही आई मला कडेवर घ्यायची. मी जसा मोठा झालो, ती माझी खास मैत्रीण झाली'. सिद्धार्थच्या जीवनात सुरु असणाऱ्या अनेक गोष्टी तो आईला सांगायचा, तिचं मार्गदर्शन घ्यायचा. वडिलांच्या निधनानंतर सिद्धार्थच्या आईनं तीन मुलांची जबबादारी आपल्या खांद्यावर घेत बिकट परिस्थितीतही मुलांच्या सर्व गरजा आणि हट्ट पूर्ण केले.
बिग बॉसच्या दरम्यान, कित्येक दिवस आईशी संपर्क नाही....
बिग बॉस या रिअॅलिटी शो दरम्यान, कार्यक्रमाच्या अटीनुसार सिद्धार्थचा आईशी फार दिवस संपर्क होऊ शकला नव्हता. पण ज्यावेळी आईचं पत्र त्याला मिळालं तेव्हा ते तिच्याच शेजारी बसून वाचत आहोत अशीच अनुभूती त्याला झाली. अनेक दिवसांनंतर सिद्धार्थ त्याच्या आईला भेटला हे क्षणही पाहण्याजोगे होते.
आई, प्रत्येकासाठी कायमच खास भूमिकेत असते. सिद्धार्थसाठीही ती तशीच होती. पण, आता मात्र याच आईला ज्या वयात आधाराची गरज आहे, त्याच वयात तिचा आधार हिरावल्याच्या घटनेला सामोरं जावं लागत आहे. दुर्दैव म्हणतात, ते हेच आणखी काय....