मुंबई : करमणुकीचे जग दुरून जेवढे चकचकीत दिसते, प्रत्यक्षात तसे नाही. ग्लॅमरच्या दुनियेत घराणेशाही, वर्णद्वेष यासारखे मुद्दे सर्रास आढळतात. त्याबाबत वेळोवेळी चर्चा रंगतात. आता प्रसिद्ध गायक कुमार सानू यांची मुलगी शैनन हिने या प्रकरणावर बोलताना तिची परिस्थिती सांगितली आहे.
वडील कुमार सानू यांच्याप्रमाणेच तिची मुलगी शैनन ही गायनाच्या जगात नाव कमावते आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात हॉलिवूडमध्ये केली. अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशांमध्येही तिला वर्णद्वेषाचा सामना करावा लागल्याचे ती सांगते.
एका मुलाखतीत तिने म्हणाली, 'मला खऱ्या आयुष्यात खूप मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. लहानपणी मला खूप त्रास झाला आहे. पाश्चात्य देशांमध्ये आपल्याला अनेकदा वर्णद्वेषाचा सामना करावा लागतो. मला आठवते की जेव्हा मी ऑडिशनसाठी गेले होते, तेव्हा मला निराश करण्यात आले. कारण मी तिथे उपस्थित असलेल्या इतर लोकांपेक्षा वेगळी दिसत होते.
अशा प्रसंगांना तोंड देण्यासाठी मी तेव्हा खूपच लहान होते. मी ऑडिशनमधून रडत घरी यायचे आणि त्यामुळे माझा आत्मविश्वास कमी झाला होता. मला फक्त कलाकार म्हणून नाही तर माणूस म्हणूनही सिद्ध करायचं होतं.
आता ती अशा गोष्टींना सामोरे जायला शिकल्याचे शैननचे म्हणणे आहे. भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी तिने या मुद्द्यावर एक गाणं बनवण्याचा निर्णयही घेतला आहे. तिथे शिक्षणासाठी गेल्यानंतर तिला मिळालेली वागणूक तिचा आत्मविश्वास कमी करणारी होती.
विशेष म्हणजे शैनन लहान वयातच आईसोबत लंडनला गेली होती. तिथे तिने संगीताचे धडे घेतले. याच संवादात तिने अलका याज्ञिक, श्रेया घोषाल, अरिजित सिंग या गायकांसोबत काम करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर तिने चित्रपटांमध्ये काम करण्याबाबतही चर्चा केली आहे.