'सिंघम अगेन' की 'भूल भुलैया 3', अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोणी मारली बाजी?

 'सिंघम अगेन' की 'भूल भुलैया 3' या चित्रपटांना प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. परंतु, अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोणी मारली बाजी? वाचा सविस्तर

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 30, 2024, 01:21 PM IST
'सिंघम अगेन' की 'भूल भुलैया 3', अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोणी मारली बाजी?  title=

Singham Again vs Bhool Bhulaiyaa 3: 2024 मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांमध्ये अजय देवगन आणि कार्तिक आर्यन यांच्या चित्रपटांचा समावेश आहे. दोन्ही चित्रपट दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच 1 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत. या दोन्ही चित्रपटांच्या निर्मात्यांमध्ये स्क्रीन शेअरिंगवरून जोरदार वाद सुरु आहे. यामुळे या चित्रपटांची प्री-सेलही उशिराने सुरु झाली आहे. परंतु, फुल फ्रेम बुकिंग सुरु झाल्यानंतर चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये कोणत्या चित्रपटाने बाजी मारली आहे. जाणून घ्या सविस्तर

अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोणी मारली बाजी? 

गेल्या अनेक दिवसांपासून रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अजय देवगन पुन्हा एकदा बाजीराव सिंघमच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यासोबतच या चित्रपटात अभिनेत्री करीना कपूर, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, अक्षय कुमार, अर्जुन कपूर आणि टायगर श्रॉफ देखील असणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटातील कलाकार हे चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अशातच आता या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. 

SACNILCच्या रिपोर्टनुसार, अजय देवगनच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटाने पहिल्या दिवसासाठी आतापर्यंत 4226 शो बुक करण्यात आले आहेत. यामधून 'सिंघम अगेन' चित्रपटाने आतापर्यंत 83.26 लाख रुपयांची कमाई केली आहे. 

'भूल भुलैया 3' ची अॅडव्हान्स बुकिंगमध्ये किती कमाई? 

अनीस बज्मी दिग्दर्शित 'भूल भुलैया 3' चित्रपटाची देखील सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होती. अशातच आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. अशा परिस्थितीत आता चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. SACNILC च्या रिपोर्टनुसार, 'भूल भुलैया 3'  चित्रपटाने आतापर्यंत 4 हजार 734 शो बुक झाले आहेत. आतापर्यंत या चित्रपटाची 66 हजार 176 तिकिटे विकली गेली आहेत. या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमधून 1.8 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 

दोन्ही चित्रपटांच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्ये वाढ होण्याची शक्यता

आज देखील या दोन्ही चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. दोन्ही चित्रपटांची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. दोन्ही चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर प्रचंड स्पर्धा सुरु झाली आहे. आता दोन्ही चित्रपटांपैकी बॉक्स ऑफिसवर कोण जास्त कमाई करणार हे बघावे लागणार आहे.