Chhaava Movie : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या 'छावा' चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. त्यानंतर सर्वांनीच या चित्रपटाच्या ट्रेलरचं कौतुक केलं. पण यानंतर ट्रेलरमधील काही दृश्यांवर आक्षेप घेण्यात आला. अनेक जणांनी यामधील नृत्यावर नाराजी देखील व्यक्त केली. राजकीय क्षेत्रामधून देखील यावर नाराजी व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, अशातच आता यामध्ये मराठी अभिनेत्याची इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत आली आहे. मालिका आणि मराठी चित्रपटांमधून घराघरांत प्रसिद्ध झालेला अभिनेता अजिंक्य राऊत सध्या चर्चेत आला आहे. अभिनेता सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी चाहत्यांच्या संपर्कात राहतो. अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत 'छावा' चित्रपटाच्या ट्रेलरवर खंत व्यक्त केली आहे.
'छावा'च्या ट्रेलरवर काय म्हणाला अजिंक्य राऊत?
मराठी अभिनेता अजिंक्य राऊत याने इन्स्टाग्रामवर नुकतंच आस्क मी सेशन घेतलं. ज्यामध्ये त्याला नेटकऱ्याने विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाबद्दल तुमचं मत काय? असा प्रश्न विचारला. यावर अभिनेत्याने व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना प्रश्नाचे उत्तर दिलं आहे. ज्यामध्ये अभिनेत्याने 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर जबरदस्त असल्याचं म्हटलं. त्याचबरोबर अभिनेता विकी कौशल हा उत्तम अभिनेता असल्याचं देखील त्याने म्हटलं. पण महाराजांची भूमिका करण्यासाठी मराठी अभिनेता हवा होता असं म्हणत अजिंक्य राऊतने 'छावा' चित्रपटाच्या ट्रेलरवर खंत व्यक्त केली आहे.
पुढे अभिनेता म्हणाला की, या चित्रपटामध्ये मराठी अभिनेत्याने महाराजांची भूमिका करायला पाहिजे होती. पण, आपण कुठेतरी इंडस्ट्रीमध्ये कमी पडत असल्याचं त्याने म्हटले. तर लहान तोंडी मोठा घास घेतोय...एक प्रेक्षक म्हणून महाराजांची भूमिका करण्यासाठी मराठी अभिनेता असायला हवा होता किंवा येत्या काळात अशाप्रकारच्या चित्रपटांमध्ये मराठी अभिनेता असावा अशी इच्छा त्याने व्यक्त केली.
पाहा व्हिडीओ
विकी कौशलचा 'छावा' चित्रपट येत्या 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात विकी कौशलसह दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना, अभिनेता अक्षय खन्ना असे कलाकार असणार आहेत. चित्रपटात सुव्रत जोशी, शुभंकर एकबोटी, संतोष जुवेकर हे मराठी कलाकार देखील असणार आहेत.