Walmik Karad is Back in Jail : पोटदुखीवर उपचार घेतल्यानंतर वाल्मिक कराड पुन्हा एकदा जेल मुक्कामी पोहोचलाय. जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुन्हा एकदा वाल्मिकची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. जिल्हा कारागृहाच्या बराक नंबर 9 मध्ये वाल्मिकचा मुक्काम आहे. फक्त वाल्मिकच नाही तर या प्रकरणातील इतर 7 आरोपी सुद्धा याच जेलच्या वेगवेगळ्या बाराकीत आहेत. गेले दोन दिवस वाल्मिक पोटदुखीमुळे बेजार होता. सोनोग्राफी करण्यात आली आहे. सिटीस्कॅन करण्यात आलं. वेगवेगळ्या ब्लड टेस्ट सुद्धा करण्यात आल्या. त्यामुळे वाल्मिकचा मुक्काम हॉस्पिटलमध्ये वाढतो की काय असं चित्र निर्माण झालं होतं. मात्र, शनिवारी रात्री नऊच्या सुमारास वाल्मिकला हॉस्पिटलमधनं सुट्टी देण्यात आली आहे. त्यानंतर त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे.
वाल्मिकला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय मात्र, यावरून आता आरोप-प्रत्यारोप होऊ लागलेत. मनोज जरांगे पाटलांनी तर वाल्मिकच्या आजारपणावरच शंका उपस्थित केली आहे. वाल्मिकला गुन्ह्यातून सोडण्यासाठी डॉक्टर आणि पोलीस षडयंत्र करत असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केलाय.
वाल्मिकला रुग्णालयात मिळत असलेल्या व्हीआयपी ट्रिटमेंटवरूनही गंभीर आरोप करण्यात आलेत. आमदार संदीप क्षीरसागर यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
जिल्हा रुग्णालयातून पुढील 7 दिवसांसाठी वाल्मिकला औषध देण्यात आलेली आहेत. त्यानंतर त्याला पुन्हा एकदा तपासणीसाठी बोलावलंय. त्यात जामिनाचा अर्ज मागे घेतल्यानं सध्या वाल्मिक जेल बाहेर निघेल असं कुठलंही चित्र नाही. त्यामुळं औषधं घेत वाल्मिकचा जेलमधील मुक्काम राहणार आहे. व्हीआयपी ट्रिटमेंटवरून आरोप होत असल्यामुळेच वाल्मिकला तडकाफडकी डिस्चार्ज दिला तर नाही ना, असाही सवाल विचारला जातोय.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला 46 दिवस पूर्ण झालेत. मात्र, तरीही आंधळे पोलिसांना सापडला नाहीये. त्याचा शोध पोलीस, सीआयडीची पथकं घेताहेत मात्र अजूनही तो तपास यंत्रणेना गुंगारा देतोय. बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलं असून कृष्णा आंधळेची माहिती देणा-यांना पोलिसांनी बक्षीस जाहीर केलंय. तसेच माहिती देणाऱ्यांचं नावही गोपनीय ठेवण्यात येणार आहे. मात्र तरीही आंधळेंचा पत्ता लागलेला नाही आहे.