पुण्यातून सिंधुदुर्गला निघालेले विमान थेट गोव्यात पोहचले; कसं ही जा.. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना फक्त मनस्ताप

पुण्यातुन कोकणात निघालेले विमान थेट गोव्याच्या विमानतळावर लँड झाले आहे. यामुळे प्रवाशांना गोव्याला जाऊन परत सिंधुदुर्गला यावे लागले. 

वनिता कांबळे | Updated: Jan 26, 2025, 10:57 PM IST
पुण्यातून सिंधुदुर्गला निघालेले विमान थेट गोव्यात पोहचले; कसं ही जा..  कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना फक्त मनस्ताप title=

Pune To Chipi Flight : अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गामुळे कोकणात जाणारे प्रवासी त्रस्त आहेत. रेल्वेने जायचे म्हंटले तरी कोकण रेल्वेवर नेहमीच प्रवाशांची गर्दी असते.  प्रवाशांच्या सोईसाठी कोकणात विमानसेवा सुरु करण्यात आली. मात्र, कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना फक्त मनस्तापच सहन करावा लागतो याची प्रचिती देणारा प्रकार घडला आहे. पुण्यातुन सिंधुदुर्गला निघालेले विमान थेट गोव्यात पोहचले. यामुळे 45 प्रवाशांना पुन्हा  सिंधुदुर्गला परत येताना त्रासदायक प्रवास करावा लागला. जाणून घेऊया नेमकं काय घडलं.

25 जानेवारी रोजी मध्यरात्री फ्लाय 91 चे विमान पुणेहून सिंधुदुर्ग साठी निघाले होते. 45 प्रवासी या विमानातून प्रवास करत होते. 25 जानेवारी पहाटे हे विमान सिंधुदुर्गच्या चीपी विमानतळावर लँड होणार होते. मात्र, हे विमान चीपी विमानतळावर न उतरवता थेट गोव्याच्या मोपा विमानतळावर लँड करण्यात आले. यामुळे प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. 

या गोंधळामागे तांत्रिक कारण समोर आले आहे. हवामान खराब असल्याचा अंदाज आल्याने हे विमान चीपी विमानतळावर उतरवण्याएवजी गोव्याच्या दिशेने नेण्यात आले. या दरम्यान चिपी ते पुणे प्रवास करण्यासाठी  प्रवासी चिपी विमानतळावर दाखल झाले होते. मात्र विमान न आल्याने प्रवासी ताटकळत थांबले. यामुळे प्रवाशांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. 

दरम्यान, चीपी विमानतळऐवजी गोव्याल्या उतरल्यानंतर या प्रवाशांना कारने मोफत सिंधुदुर्गात आणण्यात आले. मात्र, या प्रवासात प्रवाशांचा बराच वेळ वाया गेला. जलद प्रवासासाठी प्रवाशांनी विमानाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रवाशांना पुन्हा बायरोड प्रवास करावा लागल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.  खराब हवामानामुळे चीपी विमानतळावर उतरणारी अनेक विमाने रद्द करण्यात येतात. यामुळे  या विमानतळावर नाईट लँडिंग ची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशीही मागणी प्रवाशांकडून होत आहे.