मुंबई : 'थप्पड से डर नाही लगता सहाब...' असं म्हणत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी आभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लवकरच डिजिटल विश्वात डेब्यू करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही अंशी अपयशी ठरत आहेत. म्हणून तिने आपला मोर्चा डिजिटल विश्वाकडे वळवला आहे. २०१९मध्ये सोनाक्षीचे जवळपास ६ चित्रपटे रूपरे पडद्यावर दाखल झाले. पण बॉक्स ऑफिसवर त्यांनी आपली कमाल दाखवता आली नाही.
त्यानंतर आता सोनाक्षी अमेझॉन प्राईमच्या क्राईम थ्रिलरच्या माध्यमातून चाहत्यांसमोर येणार असल्याचे समोर येत आहे. रीमा कागती यांच्या वेबसीरिजमध्ये गुलशन देवइया, सोहुम शाह आणि विजय शर्मा हे कलाकार देखील भूमिका साकारताना दिसणार आहेत.
सोनाक्षीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून सीरिजच्या संपूर्ण टीमचा फोटे शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'नव्या वर्षाची नवी सुरूवात.. अमेझॉनसोबत आमची नवी सीरिज सुरू होते आहे. त्यामुळे मी फार आनंदी आहे.' असं म्हणत तिने तिच्या नव्या प्रवासाला सुरूवात केली आहे.
सोनाक्षी सिन्हाने 'दबंग' चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची सुरूवात केली आहे. त्याचप्रमाणे 'दबंग २' आणि 'दबंग ३'चित्रपटात तिने भूमिका साकारली आहे. अभिनेता सलमान सोबत तिने पहिल्यांदा स्क्रिन शेअर केली होती. आता वेब सीरिजच्या विश्वात सोनाक्षी चाहत्यांचं किती मनोरंजन करते हे पाहणं औत्युक्याचं ठरणार आहे.