मुंबई : चित्रपटसृष्टीमध्ये नायिका म्हणून आई आणि मुलीमध्ये स्पर्धा पाहाता आली असती... पण नियतीला ते मान्य नव्हतं... नायिका म्हणून जिथे श्रीदेवी पुनरागमन करत होती तर दुसऱ्या बाजुला आपल्या मुलीला बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी तयार करत होती.
'धडक' या चित्रपटातून श्रीदेवीची मुलगी जान्हवी काही महिन्यांतच भेटीला येईल. मराठी चित्रपट 'सैराट'चा हा रिमेक... श्रीदेवी आपल्या मुलीच्या बॉलिवूड पदार्पणासाठी सजग होती. अनेक चित्रपटांच्या ऑफर पाहिल्यावर अखेर करण जोहर बॅनरच्या म्हणजे धर्मा प्रोडक्शन अंतर्गत येऊ घातलेल्या 'धडक' या चित्रपटावर शिक्कामोर्तब झालं... जान्हवीसाठी मेहनत घेणारी श्रीदेवीमधील आई पदोपदी दिसत होती.
स्वत: आईच्या शिस्तीत घडलेली श्रीदेवी आपल्या मुलीसाठी तेवढीच काटेकोर होती. चित्रपटसृष्टीतील वातावरण माहित असल्यामुळे असे कदाचित... श्रीदेवीला दोन मुली जान्हवी आणि खुशी... चित्रपटात येण्याआधीच या दोघींचें सोशल मीडियावर करोडोंचा चाहता वर्ग आहे. दोघीही फॅशनिस्टा... मोठी मुलगी जान्हवी म्हणजे श्रीदेवीची हुबेहुब छबी... तर १७ वर्षांच्या खुशीवर हॉलिवूडचा प्रभाव जास्त आहे. आईसोबत पदोपदी दिसणाऱ्या या मुली आईच्या शिस्तीला प्रभाव किती आहे? हे नुकत्याच झालेल्या एका फॅशनवीकमध्ये कॅमेऱ्यांनीही टिपलं होतं. माध्यमांसमोर मुलींनी किती यावं याबाबक श्रीदेवी सजग होती.
बोनी कपूरसोबत श्रीदेवीचं हे पहिलं लग्न असलं तरी बोनी कपूर यांचं हे दुसरं लग्न... पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर बोनी कपूर यांनी श्रीदेवीशी दुसरं लग्न केलं. अर्जुन आणि अंशुला ही बोनी कपूर यांची मुलं... त्यांच्यात आलबेल नव्हतंच... अर्जून आता बॉलिवूडमध्ये स्थिरावलाय... पण त्यांचं हे यश बघायला त्याची आई हयात नाही. पहिला चित्रपट रिलीज होण्याआधी काही महिने आधीच मोना कपूर यांचं निधन झालं... आज नियतीनं जणू तेच चक्र पुन्हा फिरवलं... जान्हवीचा पहिला चित्रपट अवघ्या काही महिन्यांनी प्रदर्शित होत असताना हे पाहायला श्रीदेवी हयात नाही...
पण ती पुन्हा येईल... जान्हवी श्रीदेवी कपूरच्या रुपाने... श्रीदेवीची छबी असलेल्या जान्हवीमध्ये कदाचित त्यांना श्रीदेवी दिसेल.... श्रीदेवीच्या एका चित्रपटाची कथा प्रत्यक्षात येईल... तिचे चाहते ते 'लम्हें' पुन्हा अनुभवतील...
हे लम्हे... हे पल हम बरसों याद करेंगे...
ये मौसम चले गए तो हम फर्याद करेंगे...