मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)च्या आत्महत्येची बातमी समोर येताच कलाविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या अशा अचानक जाण्याने चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. आज मुंबईत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यासाठी त्याचे कुटुंब ११ वाजता पटनातून मुंबईत दाखल होणार आहेत. दरम्यान, सुशांतने हे टोकाचं पाऊल का उचललं असावं याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सुशांतच्या आत्महत्येमागे कट असल्याचं वक्तव्य त्याचा चुलत भाऊ आमदार नीरज बबलू यांनी केलं आहे.
नीरज म्हणाले, 'आम्हाला सुशांतचं पार्थिव शरीर बिहारला घेवून जायचं होतं. परंतु कोरोना व्हायरसमुळे आम्हाला परवानगी मिळाली नाही. त्यामुळे त्याचे अंत्यसंस्कार मुंबईत होतील. सुशांतची एक बहिण अमेरिकेत आसल्यामुळे ती येवू शकत नाही. त्याच्या इतर बहिणी मुंबईत दाखल झाल्या आहेत. '
ते पुढे म्हणाले, 'जो व्यक्ती इतरांचा आत्मविश्वास वाढवायचा तो असं काही करू शकतो यावर विश्वास बसत नाही. त्याच्या आत्महत्येमागे कट आहे की नाही हे त्याठिकाणी गेल्यावरच कळेल. सुशांतचा एक मेहुणा पोलिस अधिकारी आहे. ते या प्रकरणाची तपासणी करत आसल्याचं देखील निरज यांनी सांगितले.
दरम्यान, बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. सुशांतने त्याच्या वांद्रातल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वी सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियननेही आत्महत्या केली होती.