मुंबई : Ramanand Sagars Ramayan असं म्हटलं की निर्विवादपणे समोर आशीर्वाद देणाऱ्या रुपात उभे राहतात ते म्हणजे राम, लक्ष्मण आणि सीता. मंगल भवन अमंगल हारी... अशा ओळी गाण्याचा आवाज येऊ लागताच सर्वांच्या नजरा घरातील टीव्हीकडे वळायच्या. टेलिव्हिजन विश्वात एखाद्या कार्यक्रमाला किती लोकप्रियता मिळावी, याच्या सर्व परिसीमाच या रामानंद सागर यांच्या 'रामायण' या मालिकेने ओलांडल्या होत्या.
'रामायण' या महाकाव्याचा आधार घेत देवदेवतांच्या कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं सुरेख काम या कार्यक्रमातून केलं गेलं. यामध्ये राम, लक्ष्मण, सीता, हनुमान आणि अशी इतरही पात्र साकारणारे कलाकार तर, अनेकांच्या गळ्यातील ताईत झाले होते. कोणी या कलाकारांमध्ये खराखुरा देव पाहू लागलं होतं. तर, कोणी ते दिसताच आशीर्वाद घेण्यासाठी आदरपूर्वक त्यांच्यापुढे झुकत होतं.
'रामायण'मुळे अरुण गोविल (राम), दीपिका चिखलिया (सीता) आणि सुनील लहिरी (लक्ष्मण) या कलाकारांना एक वेगळी ओळख दिली. ही ओळख आजही कायम आहे आणि यापुढेही राहील यात शंका नाही. पण, देवत्वाचा अनुभवत घेणारी ही कलाकार मंडळी आता दिसतात तरी कसे हे तुम्हाला माहितीये का?
मालिकेच्या चित्रीकरणावेळचे त्यांचे काही धमाल किस्से, त्यांचे अनुभव साक्षात या छोट्या पडद्यावरच्या 'देवां'कडूनच ऐकण्याची संधी तुम्हा- आम्हाला मिळणार आहे. ती म्हणजे 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमातून. विविध सेलिब्रिटींना आपल्या कार्यक्रमात बोलवून त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारणाऱ्या या कार्यक्रमात यावेळी कपिलच्या भेटीला चक्क देव स्वत: आले आहेत.
पाहा : 'येसूबाईं'ना नाही आवरला लाठीकाठी खेळण्याचा मोह; व्हिडिओ व्हायरल
कलिपचे प्रश्न आणि त्यावर या मंडळींची उत्तरं, सोबत 'रामायण' साकारतानाचे अविस्मरणीय अनुभव अशा एकंदर माहोलात 'द कपिल शर्मा शो'चा खास भाग चित्रीत करण्यात आला. ज्याचा एक प्रोमोसुद्धा पोस्ट करण्यात आला आहे. जेथे राम, सीता आणि लक्ष्मण आणि कार्यक्रमात सहभाग नोंदवलेल्या आणखीही व्यक्तींच्या गप्पांचा फड रंगल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे कपिलच्या निमित्ताने प्रेक्षकांना पुन्हा एकदा साक्षात देवाला एका वेगळ्या रुपात पाहण्याची संधी मिळणार आहे, असंच म्हणावं लागेल. शनिवारी प्रेक्षकांना या कार्यक्रमाचा खास भाग पाहता येणार आहे.