मुंबई : व्हॉटस अॅपला पहिला मेसेज पाठवणारा कोण हे स्पष्ट नसल्याने, अनेकदा सोशल मीडियावर अफवांचा बाजार गरम होतो, अनेक वेळा आपणही हा मेसेज न पाठवता पुढे फॉरवर्ड करतो, पण असं आपण कधीही करू नका. कोणत्याही मेसेजची शहानिशा केल्याशिवाय, अथवा तो खोटा असेल असं लक्षात येत असेल तर फॉवर्ड करण्याचा नाद सोडा. बॉलीवूडचा अभिनेता अजय देवगनला देखील अशा अफवांमुळे नाहक त्रास झाला आहे. अजय देवगनच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्याचा एक फोटो व्हॉटस अॅपवर फिरतोय. यात एक हेलिकॉप्टर क्रश झालं असल्याचं दिसतंय.
व्हॉटस अॅपवर एका हेलिकॉप्टरचा अपघात झालेला दिसतो, यासोबत लिहिलेला एक मेसेज असतो, 'अजय देवगनच्या हेलिकॉप्टरला महाबळेश्वरमधील डोंगराळ भागात अपघात, या अपघातात पायलटचा जागीच मृत्यू ,तर अजय देवगन गंभीर जखमी', या मेसेजसह त्यावर एका अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचा फोटो लावण्यात आला आहे. पण हे खोटं आहे, कोणत्या तरी अपघाताचा फोटो लावून तो अजय देवगनच्या नावावर खपवला आहे.
डीएनए या इंग्रजी वृत्तपत्राला महाबळेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असा कोणताही अपघात झालेला नाही, ही अफवा नेमकी कुणी पसरवली, पहिला असा दिशाभूल आणि अफवा पसरवणारा मेसेज कुणी टाकला याचा शोध पोलीस घेत आहे, हा मेसेज १३ मे पासून व्हायरल झाला आहे. तसेच अभिनेता अजय देवगन सुखरुप असून त्याला कोणताही अपघात झालेला नाही.