Vivek Agnihotri on Baipan Bhari Deva : केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. या चित्रपटाचे सर्वच शो हाऊसफुल पाहायला मिळाले. बाईपण भारी देवा या चित्रपटाने 90 कोटींहून अधिकचा गल्ला जमवला होता. काही दिवसांपूर्वी हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. यानंतर अनेक बॉलिवूड कलाकार आणि दिग्दर्शक या चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहेत. आता नुकतंच ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
विवेक अग्निहोत्रींचा द कश्मीर फाईल्स हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी नुकतंच 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट पाहिला. यानंतर त्यांनी या चित्रपटाबद्दल इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ही पोस्ट केदार शिंदेंनाही टॅग केली आहे.
"मी काल पहिल्यांदाच ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट पाहिला. गेल्या कित्येक दिवसात मी इतका सुंदर चित्रपट खरंच पाहिलेला नाही. हा चित्रपट ऑस्कर पुरस्कारासाठी पात्र आहे. पण याला किमान राष्ट्रीय पुरस्कार तरी मिळायलाच पाहिजे. यात सर्वच कलाकारांनी उत्कृष्ट काम केले आहे. याचे लेखन, चित्रपटातील दृश्य सर्व काही उत्तम आहे. या चित्रपटाचे सर्वात मोठं श्रेय हे केदार शिंदे यांचं आहे. त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने हा चित्रपट बनवला आहे. केदार शिंदेंनी या चित्रपटाचे टायमिंगसह छोट्या छोट्या गोष्टींवर बारकाईने लक्ष दिलं आहे. माझ्याकडे खरंच शब्द नाहीत. रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर, दीपा चौधरी तुम्ही सर्व कमाल आहात! तुमच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला भविष्यात आणखी यश मिळो एवढीच प्रार्थना! प्रेक्षकांना एकच सांगेन… हातातली सगळी कामं बाजूला ठेऊन एकदा तरी हा चित्रपट पाहा आणि त्यानंतर मला धन्यवाद म्हणा!", असे विवेक अग्निहोत्रींनी म्हटले आहे.
विवेक अग्निहोत्रींनी या पोस्टमध्ये केदार शिंदे यांनाही टॅग केले आहे. केदार शिंदे यांनी ही स्टोरी रिशेअर केली आहे. यात त्यांनी “खूप खूप धन्यवाद सर” असं म्हटलं आहे. सध्या त्यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.
दरम्यान 'बाईपण भारी देवा' या चित्रपटात वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, रोहिणी हट्टंगडी, दीपा परब, शिल्पा नवलकर, सुकन्या मोने या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत झळकल्या होत्या. या चित्रपटाच्या कथेचे सर्वत्र कौतुक पाहायला मिळाले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाने दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले होते. तर याची निर्मिती माधुरी भोसले यांनी केली होती.