मुंबई : निवडणुकांचे निकाल अवघे काही दिवस दूर असतानाच एक्झिट पोल, ओपिनियन पोल यामुळे कलाविश्वात एका वेगळ्या वादाने डोकं वर काढलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमध्ये मध्यवर्ती भूमिकेत झळकणाऱ्या अभिनेता विवेक ओबेरॉय याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या ट्विटमुळे त्यांच्यावर अनेक कलाकारांनी आगपाखड केल्याचं पाहायला मिळत आहे. पण, विवेकही या प्रत्येक टीकेला त्याच्या शैलीत अगदी थेट शब्दांमध्ये उत्तर देत आहे.
पूर्वाश्रमीची प्रेयसी आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिची छायाचित्र असणारं एक मीम विवेकने शेअर केलं. ते निव्वळ कलात्मक असल्याचं म्हणत यात कोणतंही राजकारण नसल्याचंही त्याने नमूद केलं होतं. पण, महिला आयोगापासून काही प्रसिद्ध चेहऱ्यांपर्यंत अनेकांनी विवेकच्या या भूमिकेवर नाराजीचा सूर आळवला. अभिनेत्री सोनम कपूर हिने विवेकच्या या ट्विटला किळसवाणं आणि दर्जाहिन म्हणत आपली नाराजी व्यक्त केली. तिच्या या प्रतिक्रियेवर विवेकनेही थेट उत्तर देत सोनमला काही 'सल्ले' दिले.
Disgusting and classless. https://t.co/GUB7K6dAY8
— Sonam K Ahuja (@sonamakapoor) May 20, 2019
कधीकधी अनेकजण स्वत:ला वेगळं सिद्ध करण्यासाठी हे असं काहीतरी करतात, असं म्हणत महिला सशक्तीकरणासाठी सोनमने स्वत: किती काम केलं आहे, असा प्रतिप्रश्न त्याने उपस्थित केला.
Vivek Oberoi speaks on Sonam Kapoor's reaction to his tweet (on exit polls), "...Aap apni filmon mein thoda kam overact karein aur social media pe thoda kam overreact karein. I've been working in women empowerment for 10 yrs now. I don't think this is hurting anyone's sentiments" pic.twitter.com/pOWAwO29N6
— ANI (@ANI) May 20, 2019
गेल्या दहा वर्षांमध्ये आपण जवळपास २२०० मुलींना देहव्यापार, मजुरीच्या विळख्यातून बाहेर काढलं. पुढे जाऊन त्यांना मोफत शिक्षण, अन्नपुरवठा देऊन सशक्त केल्याला खुलासा विवेकने केला. त्याच मुलींमधील अनेकजणी या क्षणाला शिष्यवृत्तीच्या मदतीने परदेशात उच्चशिक्षणासाठीही गेल्या आहेत, असं म्हणत आपल्या या कामाची दखल 'फोर्ब्स'कडूनही घेण्यात आली असल्याची बाब त्याने स्पष्ट केली. 'सोनम ज्यावेळी तिच्या मेकओव्हरवर काम करत होती, तेव्हापासून मी महिला सशक्तीकरणावर काम करत आहे', त्यामुळे मेकओव्हर करणं म्हणजेच महिला सशक्तीकरण करणं नव्हे असा टोला अप्रत्यक्षपणे त्याने लगावला.
''तू एक अतिशय चांगली मुलगी आहेस, किंबहुना मी तुझ्या वडिलांचाही फार आदर करतो. पण, मी तुला एक सल्ला देऊ इच्छितो की चित्रपटांमध्ये तू जरा 'ओव्हरअॅक्ट' (अभिनयात अतिशयोक्ती) करणं बंद कर आणि सोशल मीडियावर 'ओव्हररिअॅक्ट' करणंही बंद कर, कारण महिला सशक्तीकरणाच्या मुद्दयावर मी गेल्या दहा वर्षांपासून काम करत आहे', असं म्हणत विवेकने सोनमला रितसर शब्दांत उत्तर दिलं आहे. त्याने दिलेला हा सल्ला पाहता आता सोनम पुन्हा एकदा यावर काही प्रतिक्रिया देणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तूर्तास राजकीय आणि कलाविश्वात विवेकच्या या ट्विटमुळे बऱ्याच चर्चा सुरु आहेत हे नाकारता येत नाही.