मुंबई : होळीच्या मुहूर्तावर अभिनेता अक्षय कुमार प्रेक्षकांना केसरी रंगात रंगवण्यासाठी सज्ज झाला आहे. अर्थात हा रंग आहे, देशाभिमानाचा, मातृभूमीवर असणाऱ्या प्रेमाचा आणि याच भूमीसाठी प्राण पणाला लावणाऱ्या धैर्याचा, साहसाचा. केसरी या त्याच्या आगामी चित्रपटातील नवं गाणं नुकत प्रदर्शित करण्यात आलं आहे. 'तेरी मिट्टी', असे बोल असणाऱ्या या गाण्याने सध्या अनेकांनाच भावुक केलं आहे. आपल्या मातृभूमीविषयी असणारं प्रेम नेमकं काय असतं याचीच प्रचिती हे गाणं पाहताना येत आहे.
अर्कोने संगीतबद्ध केलेल्या या गाण्याची चाल आणि बी. प्राकच्या आवाजात ध्वनीमुद्रीत करण्यात आलेलं हे गाणं ऐकताना अंगावर काटा उभा राहतो. त्याला जोड मिळते ती म्हणजे समोर सुरू असणाऱ्या दृश्यांची. सारागढीच्या युद्धाच्या वेळी अवघ्या २१ शूर जवानांनी कशा प्रकारे अफगाणी सैन्याचा सामना केला होता, याची झलक गाण्याच्या व्हिडिओतून पाहायला मिळत आहे.
अक्षय कुमारचा चित्रपटातील लूक हा पहिल्या दिवसापासूनच चर्चेचा विषय होता. पण, या गाण्याच्या निमित्ताने परिणीती चोप्राही तितकीच प्रभावीपणे प्रेक्षकांच्या समोर येत आहे. करण जोहरची निर्मिती असणाऱ्या 'केसरी' या चित्रपटात अक्षय कुमार 'हवालदार इशर सिंग'ची भूमिका साकारच आहे. पंजाबी चित्रपसृष्टीत नावारुपास आलेला दिग्दर्शक अनुराग सिंग याने केसरीचं दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळे या चित्रपटाकडे अनेकांच्याच नजरा लागल्या आहेत. २१ मार्चला सारागढीच्या या रणसंग्रामासह देशभक्तीचा रंगल लावण्यासाठी 'केसरी' सज्ज आहे.