मुंबई : अभिनयच नव्हे तर तिच्या संवेदनशील कवितांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी स्पृहा जोशी बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. मध्यंतरी काव्यवाचनात रमलेल्या स्पृहाने पुन्हा एकदा तिच्या अभिनेत्रीला साद घातली आहे. स्पृहा सध्या मालिका आणि सिनेमा या दोन्ही माध्यमांमधून चाहत्यांच्या भेटीला आली आहे. मोजके पण लक्षात राहील असे काम करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत स्पृहाचे नाव घेतले जाते. त्यामुळे ती मोठ्या पडद्यावर कधी दिसणार याची प्रतीक्षा संपली असून शक्तीमान या सिनेमातून स्पृहा नवी भूमिका साकारत आहे. सध्या या सिनेमाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाच्या पोस्टरमध्ये आदिनाथ कोठारे आणि ईशान कुंटे या दोघांसोबत स्पृहाचेही दर्शन घडले. त्यामुळे या छोट्या कुटुंबातील शक्तीमानला भेटण्यासाठी प्रेक्षक आतूर झाले आहेत.
हृदयाचा आजार असलेल्या एका मुलीचा जीव वाचवण्यासाठी मदत करणाऱ्या नवऱ्याची बायको अशी स्पृहाची या सिनेमात भूमिका आहे. मदत करायला तिचा विरोध नाही, पण या मदतीच्या धावपळीत नवऱ्याचे कुटुंबाकडे होणारे दुर्लक्ष तिला मान्य नाही. आदिनाथ कोठारेसोबत पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणाऱ्या स्पृहाने या सिनेमातील सुपरहिरो बनू पाहणाऱ्या नवऱ्याची बायको साकारली आहे.
''तुला सुपरहिरो व्हायचे आहे ना... हो की, पण तुला आठवण करून देते की सुपरहिरोला बायको नसते,'' असा एक संवाद स्पृहाच्या तोंडी आहे. नवऱ्याला वास्तवाची जाणीव करून देणारे स्पृहाचे हे वाक्य सध्या खूपच व्हायरल होत आहे.प्रत्येक मुलासाठी त्याचे पालक हे त्याच्यासाठी सुपरहिरो असतात. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या स्पृहाच्या आयुष्यात असं सुपरहिरो कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांनाही आहे. शक्तीमान या सिनेमातील छोट्या ईशानसाठी त्याचे बाबा सुपरहिरो व्हावेत असे वाटते, त्यांच्याकडून त्याला काहीतरी संदेश घ्यावा असे वाटते. स्पृहाच्या आयुष्यातही असे सुपरहिरो आहेत आणि ते म्हणजे तिचे आईबाबा. या दोन्ही सुपरहिरोंनी आयुष्याकडे पाहण्याचा जो सकारात्मक भाव दिला तो कमाल असल्याचे स्पृहा सांगते.
स्पृहाच्या मध्यमवर्गीय कुटुंबात येणारी व्यक्ती, नातेवाईक, पाहुणे परत जाताना खुश होऊन जातात. पहिल्या पावसात भिजायचेच असा नियम असलेल्या तिच्या घरात आईबाबा दर पावसाळ्यात मनसोक्त भिजण्याचा आनंद द्यायचे. रोजच्या जगण्यातील छोटे छोटे आनंद कसे मिळवायचे हे सांगणारे आईवडील स्पृहासाठी तिचे सुपरहिरो आहेत असं ती सांगते.
आयुष्यातील खरेपणा, भावबंध सिनेमातून मांडण्याची हातोटी असलेल्या प्रकाश कुंटे यांच्या शक्तीमान सिनेमाच्या निमित्ताने स्पृहाने तिच्या मनातील सुपरहिरोविषयीच्या भावना व्यक्त केल्या. शक्तीमान हा सिनेमा २४ मे २०२४ रोजी प्रदर्शित होत आहे. मदत हवी असलेला आणि मदत करू इच्छिणारा अशा दोन व्यक्तींमधला धागा घट्ट करणाऱ्या शक्तीमान या सिनेमाच्या ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळत आहे. आदिनाथ कोठारे, स्पृहा जोशी, ईशान कुंटे आणि प्रियदर्शन जाधव यांच्या मुख्य भूमिका आहेत. प्रकाश कुंटे म्हटले की, कॉफी आणि बरच काही, जरा हटके, हम्पी, सायकल, हे सिनेमे आठवतात. भावनांचे पदर अलगद उलगडण्याचे कौशल्य प्रकाश कुंटे यांच्या दिग्दर्शनात आहे. तोच अनुभव शक्तीमान या सिनेमातही प्रेक्षकांना मिळेल इतके भावनांचे रंग शक्तीमान या सिनेमात आहेत. चांगल्या अर्थपूर्ण कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या झी टॉकीज वाहिनीने या सिनेमाचे सॅटेलाइट वितरणाचे हक्क घेतले आहेत.