Zero Movie Review : अपेक्षाभंगाने गोंधळवणारा ‘झिरो’

सहकलाकारांनी एका अर्थी ‘झिरो’ला हिरो केलं आहे.

Updated: Dec 21, 2018, 08:34 AM IST
Zero Movie Review : अपेक्षाभंगाने गोंधळवणारा ‘झिरो’ title=

सिनेमा : झिरो

दिग्दर्शक : आनंद एल.राय

निर्माते : गौरी खान

मुख्य भूमिका : शाहरुख खान, अनुष्का शर्मा, कतरिना कैफ 

संगीत दिग्दर्शन : अजय-अतुल, तनिष्क बागची

 

सायली पाटील, झी मीडिया, मुंबई :  काही कलाकार असे असताता ज्यांच्या चित्रपटांची फार प्रसिद्धी केली नाही तरीही त्याविषयी प्रेक्षकांमध्ये असणारी उत्सुकता ही काही केल्या कमी होत नाही. मग अशा कलाकारांची नावं घ्यायची झाली की, काही चेहरे किंवा नावं आपोआपच डोळ्यांसमोर येतात. त्यातलंच एक नाव म्हणजे शाहरुख खान. कारकिर्दीत बरेच चढउतार पाहिल्यानंतर कलाविश्वात ‘किंग खान’ ही उपाधी त्याला चाहत्यांनी दिली. अर्थात ती त्याने आपल्या अभिनयाच्या बळावर कमवली. पण, हाच शाहरुख यावेळी मात्र काहीसा गडबडलेला दिसला. अभिनयाच्या बाबतीत नव्हे, तर एकंदरच ‘झिरो’ या चित्रपटाचं कथानक एकसंध ठेवण्याच्या प्रयत्नात.

आनंद एल. राय दिग्दर्शित ‘झिरो’ या चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यातील गाणी प्रदर्शित झाली तेव्हा बुटक्या व्यक्तीच्या रुपात झळकणारा शाहरुख काहीतरी अफलातून कलाविष्कार प्रेक्षकांच्या भेटीला आणत असल्याचं कुतूहल पाहायला मिळालं. पण, ‘झिरो’चं कथानक जसजसं पुढे जातं तसतसं या कथानकाने जीव सोडल्याचं लक्षात येतं.

‘बऊआ सिंग’ हे पात्र साकारणारा शाहरुख पूर्वार्धात प्रेक्षकांना हसवतो, तो प्रेम करण्याची किंबहुना प्रेमाचं नाटक करण्याची त्याची चालाखी दाखवून देतो, श्रीमंत वडिलांच्या पैशांच्या जीवावर मजा करतो, पैसे उधळतो. आपल्या आवडत्या अभिनेत्रीची एक झलक पाहण्यासाठी चक्क ‘धूम 3’ चित्रपटातील आमिर खानचा पेहराव घालण्याला प्राधान्य देतो. त्यातच एकिकडे कथानक थोडं भूतकाळात (काही महिन्यांपूर्वीच्या परिस्थितीत) डोकावतं, जिथे हाच ‘बऊआ’ लग्न करण्यासाठी म्हणून एका विवाहनोंदणी केंद्रात जातो. तिथे त्याच्या आयुष्यात प्रवेश होतो ‘आफिया’ (अनुष्का शर्मा) नावाच्या एका अतिशय हशार संशोधक आणि तितक्याच सुंदर मुलीचा.

अतिशय हुशार, पण शारीरिक अपंगत्व असणाऱ्या ‘आफिया’शी आपल्या अनोख्या अंदाजात गप्पा मारणारा हा ‘बऊआ’ आणि तिची प्रेमकहाणी नेमकी कधी सुरु होते हेच लक्षात येत नाही. बरं ही कहाणी इतकी पुढे जाते, की थेट लग्नापर्यंत जाऊन पोहोचते. त्यात या ‘बऊआ’चे खुमासदार संवाद, त्याचा चंचलपणा आणि अर्थातच तो मेरठमधील असल्यामुळे त्याचा अनोखा बाज या गोष्टी पूर्वार्धात प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणतात. एकिकडे ‘आफिया’शी लग्न करण्यासाठी सज्ज असणारा ‘बऊआ’ (शाहरुख) तर दुसरीकडे अभिनेत्री ‘बबिता कुमारी’ (कतरिना कैफ) हिच्यासाठी ठार वेडा असणारा ‘बऊआ’ अशी त्याची रुपं पाहायला मिळतात.

कतरिनाने मद्याच्या धुंदीत असणाऱ्या, प्रेमभंग झालेल्या एका अभिनेत्रीची भूमिका साकारण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. तर शाहरुखनेही त्याच्या वाट्याला आलेलं पात्रं रंगवत ते प्रभावीपणे रुपेरी पडद्यावरुन प्रेक्षकांपर्यंत आणण्यास कुठेच कमतरता पडू दिली नाही. पण, तरीही काहीतरी कमी आहे... किंबहुना बरंच काही कमी आहे.... अशीच खंत चित्रपच्या उत्तरार्धात वाटू लागते.

लग्नातून पळाललेला, थेट आपल्या आवडत्या अभिनेत्रीसोबत तिच्या सावलीप्रमाणे वावरणारा हा ‘बऊआ’ नेमका कधी, कुठे कसा पोहोचतो हे चित्रपटात कळतंय. पण, तो थेट तिथे कसा पोहोचू शकतो हा प्रश्नही सतावतो. दहावीही नीट न शिकलेला ‘बऊआ’ थेट अंतराळ संशोधन केंद्रात जातो काय, प्रेमाच्या बळावर एका महत्त्वाच्या मंगळयान अभियानावर काम करणाऱ्या ‘आफिया’ची मनधरणी करण्यासाठी धडपडतो काय, इतकच नव्हे तर उपग्रहातून थेट मंगळावर जातो काय.... याचा काही नेम नाही.

चित्रपटामध्ये काही गोष्टी या पटवून घेताही येऊ शकतात. पण, काही गोष्टी मात्र निराशाच करतात हे कथानक पुढे जातं तसतसं लक्षात येतं. मुळात अरे काय चाललंय काय... अशीच काहीशी परिस्थिती होते. ‘झिरो’ साकारण्यात अर्थातच असंख्य कलाकारांचा सहभाग आहे यात वाद नाही. पण, अगदी फिल्मी भाषेतच म्हणावं तर, वो बात बनी नही.....

सहकलाकारांचा अभिनय यामध्ये मुख्य कलाकारांच्या वरचढ ठरताना दिसतो. लहान भूमिका का असेना, पण त्या तितक्याच प्रभावीपणे साकारत सहकलाकारांनी एका अर्थी ‘झिरो’ला हिरो केलं आहे, असं म्हणायला हरकत नाही. झिशान आयुब हा शाहरुखच्या मित्राच्या भूमिकेत दिसत असून, त्याने साकारलेला ‘गुड्डू’ हा मित्र पाहता, दोस्त असावा तर असा असंच म्हणावं लागतं. अनुष्काने साकारलेली ‘आफिया’ही प्रभावी वाटते. शाहरुखला बुटक्या व्यक्तीच्या भूमीकेत पाहताना आणि त्याच्या चेहऱ्यावरच्या त्या खळ्या पाहताना कथानक पुढे जातंय खरं. पण, यामध्ये ‘झिरो’ मात्र कुठेतरी हरवत आहे.

बरेच पाहुणे कलाकार यामध्ये पाहायला मिळत असून, प्रेक्षकांसाठी खास आकर्षण आहे ते म्हणजे दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी. ‘मिस हवाहवाई’ची एक अखेरची झलक या चित्रपटातून दिसत आहे. शिवाय इतरही बरेच पाहुणे कलाकार यात झळकत आहेत. पण, हा फौजफाटा ‘झिरो’ला तारणार का, हाच मुख्य प्रश्न.

संगीत, कलाकारांची वेशभूषा, पाहुण्या कलाकारांची गर्दी सारं सारंकाही ठीक. पण एक चित्रपट, त्यातही शाहरुखचा बहुचर्चित चित्रपट पाहण्यासाठीची उत्सुकता आणि कुतूहल मात्र पूर्ण करण्यात त्याला कुठेतरी अपयश आलं आहे, असंच म्हणावं लागेल. बुटक्या व्यक्तीच्या रुपात किंग खानला पाहण्यासाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट एकदा पाहावा असा आहे. पण, तो पाहण्यासाठी जातेवेळी कोणत्याही अपेक्षांशिवाय जावं, असंच अनेकांचं म्हणणं.

- सायली पाटील
(SAYALI.PATIL@zeemedia.esselgroup.com)