Kidney Stone : आजकाल टीव्ही वरती झळकत असलेल्या जाहिरातींमध्ये बऱ्याच पान मसाल्याच्या जाहिराती आपल्याला पाहायला मिळतात. रजनीगंधा, पान पराग अश्या अनेक जाहिराती असतात. पण तुम्हाला माहितीय का? याच पान मसाल्याचे अति सेवन केलं तर किडनी स्टोन सारखा आजार होऊ शकतो. आधीच भारतात किडनी स्टोनची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. देशभरात मोठ्या प्रमाणात लोक त्याला बळी पडत आहे. अशातच किडनी स्टोनवरुन एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी (केजीएमयू) येथील युरोलॉजी कॉन्फरन्समधील तज्ज्ञांनी म्हटले आहे की, प्रदूषित पाणी आणि पान मसाल्याच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात मूतखडे (किडनी स्टोन) होऊ शकतात. या किडनी स्टोनचा आकार हा दोन सेंमीपेक्षा जास्त असू शकतो. अशी माहिती अहवालात प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान उत्तर प्रदेशच्या युरोलॉजिकल असोसिएशनने आयोजित केलेल्या या परिषदेत किडनी स्टोनसाठी अत्याधुनिक उपचारांचा शोध घेण्यासाठी देशभरातील डॉक्टर सहभागी झाले होते.
यावेळी डॉक्टरांनी सांगितले की, रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात आलेल्या रुग्णांमध्ये दोन सेंमीपेक्षा जास्त मोठे दगड असलेले सुमारे 70 टक्के रुग्ण हे पान मसाला खाणारे होते. अपुरे हायड्रेशन किंवा दूषित पाणी यासारख्या घटकांमुळे हे खडे झाले असल्याचे तज्ज्ञांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच मूतखड्यामुळे तीव्र वेदना होतात.
काही लोकांना किडनी स्टोन का होतात, याबाबत याचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, आनुवंशिक हे एक कारण आहे. तसेच हायड्रेशन, आहाराचे महत्त्व आणि उच्च रक्तदाब, मधुमेह, वेदनाशामक औषधांचे परिणाम याचा प्रभाव हा दिसून येत आहे. भारतात किडनी स्टोन होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या आजाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सल्ला दिला आहे.
किडनी हा आपल्या शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण त्याचे मुख्य कार्य रक्त फिल्टर करणे आहे. ही प्रक्रिया झाल्यावर कॅल्शियम, सोडियम आणि अनेक खनिजांचे कण मूत्राशयाद्वारे शरीरात पोहोचतात. जिथे या गोष्टींचे प्रमाण वाढू लागते आणि मग ते जमा झाल्यावर दगडचा आकार घेऊ लागतात ज्याला आपण किजनी स्टोन असं म्हणतो. ज्या लोकांना किडनी स्टोनची तक्रार आहे त्यांनी खाण्यापिण्यात विशेष काळजी घेतली पाहिजे.