साधी दातदुखी समजून केलं दुर्लक्ष, जबडा सुन्न पडल्यानंतर डेन्टिस्टकडे गेला; रिपोर्ट पाहून पायाखालची जमीनच सरकली

दातदुखी आणि जबड्यात सूज येणे यासारखी असामान्य लक्षणं प्रोस्टेट कॅन्सरची असू शकतात हे एका घटनेतून उघड झालं आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 14, 2025, 09:47 PM IST
साधी दातदुखी समजून केलं दुर्लक्ष, जबडा सुन्न पडल्यानंतर डेन्टिस्टकडे गेला; रिपोर्ट पाहून पायाखालची जमीनच सरकली title=

आपण शरिरातील काही दुखण्यांकडे सामान्य समजून दुर्लक्ष करतो. पण अनेकदा वरवर साधारण वाटणारं हे दुखणं एखाद्या मोठ्या आजाराची चाहूल असते. नुकतीच अशी एक घटना समोर आली. एका व्यक्तीचे दात सतत दुखत होते. तसंच जबडा सुन्न पडल्यानंतर डेन्टिस्टकडे जाऊन तपासणी केली. पण जेव्हा रिपोर्ट आले तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्याला प्रोस्टेट कॅन्सर झाल्याचं निष्पन्न झालं. 

प्रोस्टेट कर्करोगाच्या सामान्य लक्षणांबद्दल बोलायचं गेल्यास त्यात लघवीला त्रास होणे, इरेक्टाइल डिसफंक्शन आणि अचानक वजन कमी होणं ही आहेत. पण 78 वर्षांच्या एका निरोगी पुरूषासाठी दातदुखी आणि हिरड्यांना सूज येणं ही होती. 

एका 70 वर्षीय पुरूषाला त्याच्या डाव्या खालच्या प्री-मोलरमुळे वेदना होत असल्याचं वृत्त आहे. अखेर, त्याने डेन्टिस्टकडे जाऊन दात काढण्याचा निर्णय घेतला, असं वृत्त द सनने दिलं आहे.

जबड्यात आढळली जखम 

दात काढल्यानंतरही त्याच्या वेदना कमी होत नव्हत्या. हिरड्यांमध्ये अचानक सूज वाढल्यामुळे त्याला पुन्हा डॉक्टरकडे जावं लागलं. सीटी स्कॅन केल्यानंतर, डेन्टिस्टला त्याच्या जबड्यात जखम आढळली. यानंतर त्याला पुढील तपासणीचा सल्ला देण्यात आला.

अनेक चाचण्या केल्यानंतर त्याची जखम मेटास्टॅटिक प्रोस्टेट कर्करोग असल्याचं निष्पन्न झालं. हा कर्करोग शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतो. "इतर अनेक कर्करोगांप्रमाणे, प्रोस्टेट कर्करोग जबड्यात पसरु शकतो," अशी माहिती डेंटममधील ओरल सर्जन डॉ. आंद्रेज बोझिक यांनी दिल्याचं द सनने म्हटलं आहे. 

प्रोस्टेट कर्करोग प्रोस्टेटमध्ये होतो,  जो पुरूषांमध्ये आढळणारी एक लहान ग्रंथी आहे. मेयो क्लिनिक वेबसाइटनुसार, पुरुषांमध्ये अक्रोडाच्या आकाराची लहान ग्रंथी शुक्राणूंच्या वाहतुकीसाठी आवश्यक असलेले सेमिनल फ्लुइड तयार करते.

प्रोस्टेट कॅन्सरची नेमकी लक्षणं काय?

साधारणपणे, प्रोस्टेट कर्करोगाची सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही चिन्हं किंवा लक्षणं दिसून येत नाहीत. ज्यामुळे ते ओळखणे कठीण होते. जर एखाद्या व्यक्तीला प्रोस्टेट कर्करोग झाला असेल तर त्याला लघवी करण्यात त्रास होणे, लघवीच्या प्रवाहात शक्ती कमी होणे, लघवीमध्ये रक्त येणे, वजन कमी होणे, इरेक्टाइल डिसफंक्शन इत्यादी लक्षणे दिसू शकतात.

दातदुखी किंवा हिरड्या सूजणं लक्षणं असू शकतात का?

डॉ. आंद्रेज बोझिक यांच्या मते, जबड्याच्या हाडात रक्ताभिसरण चांगले असते आणि अस्थिमज्जा सक्रिय असतो. म्हणूनच, मेटास्टॅटिक कर्करोगाच्या पेशींच्या वाढीसाठी ते अनुकूल स्थान असू शकते. जबड्यात मेटास्टॅटिक प्रोस्टेट कर्करोग होणं ही एक दुर्मिळ घटना आहे. परंतु जर तो झाला तर याचा अर्थ असा की कर्करोग मोठ्या प्रमाणात पसरला आहे.

"रुग्णांना जबड्यात सतत सूज येणे, वेदना होणे, विनाकारण दात सैल होणे किंवा दात काढल्यानंतर उशीरा बरे होणे यासारखी लक्षणे जाणवू शकतात," डॉ. बोझिक म्हणाले.