9 महिन्यांपूर्वी झाला मृत्यू आणि 17 डिसेंबरला दिला लसीचा दुसरा डोस

मोबाईल मेसेज पाहून मृत वृद्धाचे नातेवाईक आश्चर्यचकित झाले.

Updated: Dec 20, 2021, 10:17 AM IST
9 महिन्यांपूर्वी झाला मृत्यू आणि 17 डिसेंबरला दिला लसीचा दुसरा डोस title=

जोधपूर : राजस्थानच्या जोधपूरमधून वैद्यकीय विभागाचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. जिथे 9 महिन्यांपूर्वी एका वृद्धाचा मृत्यू झाला होता, मात्र दुसऱ्या डोसच्या यशस्वी लसीकरणाचा मेसेज त्याच्या मोबाईलवर आला.

दरम्यान मोबाईल मेसेज पाहून मृत वृद्धाचे नातेवाईक आश्चर्यचकित झाले. 14 मार्च 2021 रोजी वृद्ध मृत्यू झाल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे. 17 डिसेंबरला लसीकरण झाल्याचा मेसेज त्यांना आला.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी प्रमाणपत्र डाउनलोड केलं तेव्हा त्यात लिहिले होते की, तुमचा पहिला डोस 5 मार्चला आणि दुसरा डोस 17 डिसेंबरला झाला आहे. त्या प्रमाणपत्रातही लसीकरण करणाऱ्या एनएमचे नाव उषा कंवर असं नमूद करण्यात आलं आहे. 

14 मार्चला झाला मृत्यू

नातेवाईक मनोज बोहरा यांनी एका वेबसाईटला सांगितलं की, 17 डिसेंबरच्या संध्याकाळी मोबाईलवर मेसेज आला आणि तुम्हाला लस मिळाल्याचं अभिनंदन केलं. त्याचसोबत प्रमाणपत्र डाउनलोड करण्यास सांगितलं. म्हणून आम्ही डाउनलोड केलं तेव्हा कळलं की लस देऊन झाली आहे. 

मनोजने सांगितलं की, "माझ्या वडिलांचं 14 मार्च रोजी निधन झालं असून 17 डिसेंबर रोजी मेसेज आला आहे. मात्र या लसी कोणाकडे आणि कुठे जात आहेत, याची चौकशी सरकारने करावी. ही फसवणूक थांबली पाहिजे."

घटनेची चौकशी सुरु

मनोज बोहरा सांगतात की, आम्ही जिल्हा प्रजनन आणि बाल अधिकारी कौशल दवे यांना सांगितलं असता, ते म्हणाले की, अनेक सारख्या क्रमांकांमुळे चुकीची पडताळणी झाली असावी. त्याचा तपास सुरू आहे. याप्रकरणी कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.